नवी दिल्ली : ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची बहीण आणि प्रख्यात लेखिका गीता मेहता यांनी भारत सरकारतर्फे देण्यात येणारा 'पद्मश्री' पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर घोषित करण्यात आलेला हा पुरस्कार मी स्वीकारू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.


भारत सरकारकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले. गीता मेहता यांना शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी 'पद्मश्री' पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. परंतू त्यांनी सन्मानपुर्वक हा पुरस्कार नाकारला आहे. सध्या परदेशात राहत असलेल्या मेहता यांच्याकडून तसे निवेदन देण्यात आले आहे.

"पद्मश्री पुरस्कारासाठी माझी निवड झाली. हा माझा सन्मानच आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घोषित करण्यात आलेला हा पुरस्कार मी स्वीकारू शकत नाही. अशावेळी हा सन्मान दिल्याने त्याचा गैरअर्थ निघू शकतो. त्यामुळे हा किताब स्वीकारणे माझ्यासाठी आणि सरकारसाठीही लज्जास्पद बाब असेल", अशी प्रतिक्रिया गीता यांनी दिली आहे.