नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये सध्या पाण्याची टंचाई आहे. त्यातच भारत-पाकिस्तानमधील सिंधू जलकराराचे भारताकडून उल्लंघन होत असल्याचा आरोप पाकिस्तानकडून होत आहे. भारतानेदेखील पाकिस्तानवर सिंधू जल कराराचे उल्लंघन केल्याचे आरोप केले आहेत. त्यामुळे येत्या काळात दोन्ही देशांमध्ये पाणी प्रश्न पेटणार असल्याचे चित्र दिसत आहे.
पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराचीवर सध्या जलसंकट ओढवले आहे. कराची आणि आपसपासच्या गावांमध्ये पाण्याचा तुटवडा आहे. या परिसरातील लोकांना दररोज पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे.
दरम्यान भारतानेदेखील पाण्याबाबत देशांतर्गत एक सर्वेक्षण केले आहे. त्या सर्वेक्षणानुसार भारतातील 70 टक्के लोकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही. आपल्या देशात अनेक ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत उभय देशांमध्ये सिंधू नदीच्या पाण्यावरुन मोठा वाद होणार आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये 59 वर्षांपूर्वी सिंधू जल करार झाला आहे. या कराराचे उल्लंघन होत असल्याचा आरोप भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी एकमेकांवर केला आहे. सध्या भारताकडून चिनाब नदीवर जलविद्युत प्रकल्पाचे काम सुरू आहे. यावर पाकिस्तानचा आक्षेप आहे. या जलविद्युत प्रकल्पाचा दाखला देत भारताकडून सिंधू जल कराराचे उल्लंघन सुरू असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. यामुळे पाकिस्तानमधील पाणी पुरवठ्यावर परिणाम होईल, अशी भीती पाकिस्तानकडून व्यक्त केली जात आहे.
चिनाब नदीवरील जलविद्युत प्रकल्प आणि पाकिस्तानमधील पाणीटंचाई या प्रकरणांचा अभ्यास करण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एक पथक नेमले आहे. हे पथक चिनाब नदीजवळ प्रकल्पाची पाहणीदेखील करणार आहे.
दुसऱ्या बाजूला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी चिनाब नदीवरील जलविद्युत प्रकल्प मोदी सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे. त्यामुळे हा प्रकल्प दोन्ही देशांमधील वादाचे कारण ठरू शकतो.
पाण्यावरुन भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Jan 2019 07:16 AM (IST)
भारत-पाकिस्तानमधील सिंधू जलकराराचे भारताकडून उल्लंघन होत असल्याचा आरोप पाकिस्तानकडून होत आहे. भारतानेदेखील पाकिस्तानवर सिंधू जल कराराचे उल्लंघन केल्याचे आरोप केले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -