Nowruz 2023 Google Doodle : आज नवरोझ (Nowruz 202) म्हणजेच पारशी बांधवांचं नवीन वर्ष. याच सणाच्या निमित्ताने गुगलने त्यांचे होमपेज एका खास डूडलने सजवले आहे. पारशी समाजाच्या मान्यतेनुसार 'नवरोझ' हा वसंत ऋतुचा पहिला दिवस आहे. अशा परिस्थितीत गुगल आज जगभरातील लोकांना सुंदर डूडलद्वारे शुभेच्छा देत आहे. नवरोझवर शेअर केलेल्या डूडलमध्ये रंगीबेरंगी फुले, मधमाश्या आणि गिटारची चित्रे आहेत. ही फुले वसंत ऋतूला सुरुवात झाल्याची आठवण करून देतात. नवरोझच्या दिवशी नवीन कपडे खरेदी करून घर फुलांनी सजवण्याची परंपरा आहे. अनेक घरांमध्ये चंदनाच्या लाकडानेही घर सुगंधित करण्यात येतं.


'असा' आहे नवरोझचा इतिहास 


जगभरातील पारशी समाजातील लोक आपला 'नवरोझ' हा सण खास पद्धतीने साजरा करतात. खरंतर, 'नवरोझ' हा पर्शियन शब्द आहे, जो नव आणि गुलाब या दोन शब्दांनी बनलेला आहे. नव म्हणजे 'नवीन' आणि रोज म्हणजे 'दिवस', म्हणून 'नवरोझ' म्हणजे 'नवीन दिवस'. नवरोझ साजरा करण्याचा इतिहास साधारणपणे तीन हजार वर्षांहून अधिक जुना आहे. पारशी समाज या सणाला 'पतेती' किंवा 'जमशेदी नवरोझ' असेही म्हणतात.


'या' देशात साजरा करतात नवरोझ 


नवरोझचा हा सण इराण, इराक, भारत, अफगाणिस्तान आणि मध्य आशियात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पर्शियाचा राजा जमशेद यांनी आपल्या समाजातील लोकांना पारशी दिनदर्शिकेची ओळख करून दिली म्हणून आजचे नववर्ष पारशी समाज 'जमशेदी नवरोज' म्हणून साजरे करतात.


अग्नीला साक्षी मानून प्रार्थना करतात


नवरोझच्या दिवशी पारशी कुटुंबातील लहानथोर सर्वच व्यक्ती पहाटेपासूनच उत्सवाच्या तयारीला लागतात. या दिवशी घरांची स्वच्छता आणि सजावट केली जाते. पारशी मंदिरांमध्ये विशेष प्रार्थना आयोजित केल्या जातात, ज्यात समाजातील सदस्य उपस्थित असतात. या दिवशी लोक नवीन कपडे घालतात, मंदिरात जातात, घरात मिठाई आणि पदार्थ बनवतात आणि लोक एकमेकांना भेटवस्तू देऊन आनंद साजरा करतात. पारशी समाजाचे लोक मंदिरातील अग्नीला साक्षी मानतात आणि स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी सुख, शांती आणि समृद्धीची प्रार्थना करतात आणि गरिबांना दान देखील करतात. यानंतर एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात. नवरोझच्या निमित्ताने घरोघरी पाहुण्यांच्या भेटीगाठी आणि त्यांना शुभेच्या देण्यात येतात. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Gudi Padwa 2023 : यंदाच्या गुढीपाडव्याचा 'हा' आहे शुभमुहूर्त, जाणून घ्या पूजा, तिथी आणि धार्मिक महत्त्व