Coronavirus Treatment New Guidelines : देशातील कोरोनाचा संसर्ग (Covid19 Cases) पुन्हा वेगाने पसरताना दिसत आहेत. देशातील कोरोना (Coronavirus) रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. देशात एका दिवसात हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. ही 129 दिवसांतील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासन सतर्क झालं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना वाढत्या कोरोना संसर्गावर बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगितलं आहे. तसेच कोरोना उपचार पद्धतीबाबत नव्याने मार्गदर्शक सूचनाही केल्या आहेत. बॅक्टेरिअल इन्फेक्शन म्हणजे जीवाणू संक्रमण नसेल तर अँटीबायोटीक औषधं देणं टाळण्याच्या सूचना आरोग्य मंत्रालयाने दिल्या आहेत.


कोरोना संसर्ग झाल्यास 'ही' औषधं टाळा


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाचा वाढता धोका पाहता कोरोनाबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सध्या भारतात कोरोनाच्या प्रौढ रूग्णांच्या उपचारांसाठी 'लोपीनाविर-रिटोनावीर', 'हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन', 'आयव्हरमेक्टिन', 'मोलनुपिराविर', 'फॅविपिरावीर', 'अझिथ्रोमायसिन' आणि 'डॉक्सीसायक्लिन' यासारखी औषधे वापरली जाऊ नयेत, असं सांगण्यात आलं आहे.


तसेच प्लाझ्मा थेरपी टाळण्याचा सल्ला


आरोग्य मंत्रालयानुसार, AIIMS, ICMR आणि कोविड (Covid-19) नॅशनल टास्क फोर्स (NTF) ची 'क्लिनिकल गाइडन्स प्रोटोकॉल' सुधारण्यासाठी 5 जानेवारी रोजी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत डॉक्टरांना अँटीबायोटीक आणि प्लाझ्मा थेरपीचा वापर टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


एका दिवसात 1071 कोरोनाबाधित


देशात गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली होती. मात्र, मागील काही आठवड्यांपासून देशातीन कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. एका दिवसात 1000 हून अधिक रुग्ण आढळलले आहेत. भारतात 129 दिवसांनंतर एका दिवसात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्याआधी कोरोनाबाधित फार कमी होते. त्यामुळे वाढता कोरोना संसर्ग ही चिंतेची बाब आहे.


देशात 6350 सक्रिय कोरोना रुग्ण


भारतात 129 दिवसांनंतर एका दिवसात नवीन रुग्णांचा आकडा एक हजारच्या पुढे गेला आहे. भारतात सध्या कोरोनाचे सक्रिय रुग्ण 6350 असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. देशात सोमवारी एकूण 1,071 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, केरळ आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, भारतात कोरोना महामारी सुरु झाल्यापासून आतापर्यंत कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 5,30,802 झाली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Corona Guidelines : पुन्हा कोरोनाचा वाढता धोका, आरोग्य मंत्रालयाकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी, 'या' गोष्टींची काळजी घ्या