Interpol Drops Notice Against Mehul Choksi : पीएनबी बँकेची (Punjab National Bank Scam) फसवणूक करणारा मेहुल चोक्सी (Mehul Choksi) आता जगात कुठेही फिरू शकणार आहे. फरार आरोपी मेहुल चोक्सीला इंटरपोलकडून दिलासा मिळाला आहे. त्याच्याबाबत इंटरपोलनं जारी केलेली रेड कॉर्नर नोटीस मागे घेण्यात आली आहे. इंटरपोलने 2018 मध्ये मेहुल चोक्सीविरोधात रेड नोटीस जारी केली होती. भारतातून फरार झाल्यानंतर जवळपास 10 महिन्यांनी ही नोटीस बजावण्यात आली होती. तसेच, 2022 मध्ये जारी करण्यात आलेल्या रेड कॉर्नर नोटीसला मेहुल चोक्सीनं आव्हान दिलं होतं. तसेच, या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणीही केली होती. 


फरार आरोपी मेहुल चोक्सीची रेड नोटीस रद्द


पंजाब नॅशनल बँकेतील 13 हजार कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी इंटरपोलच्या 'रेड नोटीस'मधून फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचं नाव मागे घेण्यात आलं आहे. मेहुल चोक्सीने फ्रान्सच्या लियोन शहरातील इंटरपोलच्या मुख्यालयात रेड नोटीसला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. दुसरीकडे सीबीआयने या घडामोडीवर मौन बाळगलं आहे.


रेड नोटीस म्हणजे काय?


'रेड नोटीस' म्हणजे प्रत्यार्पण, आत्मसमर्पण किंवा तत्सम कायदेशीर कारवाई प्रलंबित असलेल्या व्यक्तीला शोधून तात्पुरती अटक करण्यासाठी जगभरातील कायद्याची अंमलबजावणी करणारी विनंती म्हणजे रेड नोटीस. रेड नोटीस हे आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट नाही. आरोपीला मायदेशी परत आणण्यासाठी ही नोटीस फार महत्त्वाची ठरते. इंटरपोलकडून 195 सदस्यीय राष्ट्र-राज्य संस्थांना रेड नोटीस जारी केली जाते. 


2018 मध्ये मेहुल चोक्सीला रेड नोटीस


इंटरपोलने 2018 मध्ये मेहुल चोक्सीविरोधात रेड नोटीस जारी केली होती. भारतातून फरार झालेल्या चोक्सीविरोधात सुमारे 10 महिन्यांनी रेड नोटीस बजावण्यात आली होती. त्याच वर्षी मेहुल चोक्सीने कॅरेबियन देश अँटिग्वा आणि बार्बुडाचं नागरिकत्व घेतलं.


सीबीआयच्या रेड नोटीसला चोक्सीचं आव्हान


भारतातील फरार मेहुल चोक्सीने आपल्याविरुद्ध रेड नोटीस जारी करण्याच्या सीबीआयच्या अर्जाला आव्हान दिलं होतं. हे प्रकरण राजकीय षड्यंत्राचा परिणाम असल्याचं चोक्सीनं म्हटलं होतं. चोक्सीनं आपल्या याचिकेत भारतातील तुरुंगातील परिस्थिती, त्याची वैयक्तिक सुरक्षा आणि आरोग्य यासारखे मुद्देही मांडले होते. रिपोर्टनुसार, चोक्सीच्या याचिकेनंतर हे प्रकरण पाच सदस्यीय इंटरपोल समितीच्या न्यायालयासमोर ठेवण्यात आलं. या समितीला कमिशन फॉर कंट्रोल फाइल्स म्हणतात. समितीनं सुनावणीनंतर मेहुल चोक्सीची रेड नोटीस रद्द केली आहे.


2018 मध्ये PNB घोटाळा उघड झाला


पंजाब नॅशनल बँकेत हजारो कोटींचा घोटाळा 2018 मध्ये उघडकीस आला होता. मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांनी बँकांची हजारो कोटींची फसवणूक केली आहे. घोटाळा उघडकीस आल्यानंतर दोघे काका-पुतणे देश सोडून पळून गेले. मेहुल चोक्सी हा नीरव मोदीचा मामा आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


PNB Scam Case : PNB बँक घोटाळ्यातील एकमेव महिला आरोपीला पाच वर्षांनी जामीन मंजूर, कविता माणकीकर यांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा