नवी दिल्ली : तुम्ही सिबिल रिपोर्टविषयी ऐकलंच असेल. सिबील रिपोर्ट म्हणजे तुमची पत दाखवणारा पुरावाच. हा क्रेडिट रिपोर्ट घेण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतात. मात्र आता रिझर्व बँकेने हा क्रेडिट रिपोर्ट वर्षातून एकदा विनंती केल्यावर पूर्णपणे मोफत उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश क्रेडिट रेटिंग कंपन्यांना दिलेत. त्याची अंमलबजावणीही 1 जानेवारीपासून सुरू झालीय.
कुणाही सर्वसाधारण व्यक्तीला त्याचं क्रेडिट रेटिंग देणाऱ्या चार कंपन्या आहेत. त्यापैकी सिबील ही एक. सीबील म्हणजे, क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिडेट... सिबिलच्या रिपोर्टमध्ये तुमचं क्रेडिट रेटिंग चांगलं नसेल तर तुम्हाला कुणीही म्हणजे कोणतीही बँक किंवा आर्थिक संस्था लोन देणार नाही.
कुणाही आम नागरिकाची पत निर्धारित करणाऱ्या तब्बल चार कंपन्या आहेत. या कंपन्या तुम्हाला व्यक्तिगत आणि तुमच्या बँकांना तुमच्या क्रेडिट रेटिंगविषयी विनंती केल्यावर माहिती देतात. त्यामध्ये गेल्या तीन वर्षातले तुमचे आर्थिक व्यवहार कसे आहेत, तुम्ही काही हफ्ते किंवा क्रेडिट कार्डची देणी थकवली आहेत का? याचा तपशील असतो. त्यावरून तुमचं क्रेडिट रेटिंग ठरतं, त्यावरून तुम्हाला नवं कर्ज द्यायचं की नाही, याचा निर्णय बँका घेतात.
आता रिझर्व बँकेने या चारही कंपन्यांना कुणाही आम नागरिकाला स्वतःची ऐपत जाणून घ्यायची असेल तर तो आवश्यक रिपोर्ट मोफत उपलब्ध करून देणं बंधनकारक केलंय. आधी त्यासाठी चारशे ते पाचशे रूपये मोजावे लागायचे. आताही पैसे मोजावे लागतील मात्र तुम्ही वर्षातून एकदा तो मोफत मिळवू शकाल. त्यापेक्षा जास्त वेळा क्रेडिट हिस्ट्री रिपोर्ट तुम्हाला हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला चार्ज भरावा लागेल.
सिबिलप्रमाणेच अन्य चार संस्था किंवा कंपन्या म्हणजे, इक्विफॅक्स क्रेडिट इन्फॉर्मेशन सर्विसेस प्रा लि, एक्स्पेरियन क्रेडिट इन्फॉर्मेशन सर्विसेस प्रा लि आणि सीआरआयएफ हायमार्क क्रेडिट इन्फॉर्मेशन सर्विसेस प्रा लि...
या चारही कंपन्या बँका किंवा व्यक्तिगत पॅनकार्डधारक यांना त्यांच्या विनंतीवरून क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्ट तयार करून देतात. अनेकदा तुम्ही कुणाही बँकेकडे कर्ज मागणी केली तर संबंधित बँक या चारपैकी एका बँकेकडून तुमचं क्रेडिट रेटिंग जाणून घेते. या सीआयआर म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्टमध्ये तुम्ही घेतलेली कर्जे, त्याचे हफ्ते, तुम्ही क्रेडिट कार्डावर केलेली खरेदी, त्याची बिले चुकवली आहेत की नाही, याचा तपशील असतो. या चारही कंपन्या ही माहिती तुमचा फोन नंबर, पॅन नंबर आणि जन्मतारीख यावरून मिळवतात. ही माहिती फक्त विनंतीवरून बँका किंवा संबंधितालाच देता येते, त्रयस्थ संस्थेला किंवा व्यावसायिक कारणांसाठी या माहितीचा त्यांना वापर करता येत नाही.
सिबिलने दिलेल्या माहितीनुसार, क्रेडिट रेटिंग पॉईंटची रेंज ही 300 ते 900 दरम्यान असते. त्यानुसार 80 टक्के कर्जवाटप हे किमान 750 किंवा त्यापेक्षा जास्त क्रेडिट रेटिंग असलेल्या खातेदारांनाच होतं. त्यापेक्षा रेटिंग कमी आलं तर तुमच्या कर्जाची मागणी संबंधित बँकेकडून फेटाळली जाते.
त्यामुळेच ऑनलाईन माध्यमातून किंवा क्रेडिट कार्ड किंवा पॅनकार्ड देऊन केलेल्या प्रत्येक व्यवहारांवर कुणाची तरी नजर असते. किंवा त्याची माहिती या क्रेडिट रेटिंग कंपन्याना मिळवता येते. अशा व्यवहारांची माहिती मिळवण्यावर सध्या मर्यादा असली तरी तुम्ही थकवलेले कर्जाचे हफ्ते किंवा क्रेडिट कार्डची देणी यामुळे तुमची ऐपत खालावू शकते. त्यासाठीच आपली पत ऐपत सांभाळायची असेल तर सर्व प्रकारची देणी वेळच्या वेळी फेडा आणि नव्या कर्जासाठी पात्र व्हा...