मोदींच्या गुजरातमध्ये 18 वर्षे नगरसेवक, आता शिवेसेनेत प्रवेश
एबीपी माझा वेब टीम | 20 Jan 2017 01:19 PM (IST)
मुंबई : आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र, शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्या एका नगरसेवकाचा प्रवेश चर्चेचा विषय ठरला आहे. गुजरात राज्यात गेली 18 वर्षे नगरसेवक पद भूषवलेल्या अशोक पवार यांनी शिवेसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शेकडो भाजप कार्यकर्त्यांसोबत अशोक पवार हे मुंबईत 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत अधिकृत प्रवेश करतील. कुणी तिकिटासाठी, तर कुणी तिकीट न दिल्याने एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी घेत आहेत. अगदी आमदार, खासदार राहिलेले नेतेही महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतर करत आहेत. मात्र, थेट गुजरातमध्ये 18 वर्षे नगरसेवक राहिलेल्या अशोक पवार यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.