नवी दिल्ली : तुम्हाला आता तुमच्या दिनचर्येचा हिशेब केंद्र सरकारला द्यावा लागणार आहे. केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागाकडून याबाबत सर्व्हे केला जात आहे.  तुम्ही दिवसभर घरी काय करता?, तुमचा वेळ कसा घालवता? हे सगळं तुम्हाला आता सरकारला सांगावं लागणार आहे.

देशातील लोक 24 तासांतील किती वेळेचा वापर करतात आणि किती दुरुपयोग करतात हे समजण्यासाठी हा सर्व्हे केला जाणार आहे. 1998-99 मध्ये पहिल्यांदा हरियाणा, मध्यप्रदेश, गुजरात, ओडिशा, केरळ आणि मेघालयात अशी मोहीम राबवली गेली होती. आता संपूर्ण देशात ही मोहीम राबविली जात असल्याचं सांख्यिकी सचिव प्रविण श्रीवास्तव यांनी सांगितलं.

केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागाने जानेवारीपासून ‘हाऊस होल्ड टाइम यूज’ सर्व्हे सुरु केला आहे. त्याद्वारे तुम्ही दिवसभर घरी घालवित असलेल्या वेळेची माहिती जाणून घेण्यात येणार आहे. डिसेंबरपर्यंत हा डाटा येणार आहे. त्यातून देशातील लोक 24  तासांतील किती वेळेचा वापर करतात आणि किती दुरुपयोग करतात हे माहीत पडेल.

लखनऊ विद्यापीठात सांख्यिकी विभागाने आयोजीत केलेल्या परिसंवादात सांख्यिकी सचिव प्रविण श्रीवास्तव बोलत होते. तसेच लखनऊ विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. एसपी सिंह यांनी सांख्यिकीमध्ये लक्ष्य गाठण्यासाठी कठोर मेहनत करावी लागेल. अनेकदा अनेक प्रकल्प हाती घेतले जातात, पण ते पूर्ण होत नाही. या नव्या मोहीमेच्या बाबतीत असं होऊ नये, असं मतं त्यांनी व्यक्त केलं.