सोलन : हिमाचल प्रदेशातील सोलनमध्ये ढाबा आणि गेस्ट हाऊसची चार मजली इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत सहा जवानांसह एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले होते. आतापर्यंत 23 नागरिकांना वाचवण्यात यश आलं आहे.
दुर्घटनेनंतर बचावकार्यासाठी सेना आणि एनडीआरएफला पाचरण करण्यात आलं होतं. नाहन-कुमारहट्टी मार्गावर असलेली इमारत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे कोसळली, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. या इमारतीत सेनेचे 30 जवान कुटुंबियांसह ढाब्यावर जेवणासाठी थांबले असताना ही दुर्घटना घडली.
ढाबा चालवणाऱ्या महिलेचा देखील या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. रात्रभर याठिकाणी बचावकार्य सुरु होतं. एनडीआरएफची टीम रात्रभर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेत होती. अद्यापही ढिगाऱ्याखाली काही अडकल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री आज बचावकार्याचा आढावा आणि जखमींना भेटण्यासाठी जाणार आहेत.
सोलनचे उपायुक्त के. सी चमन यांनीही काही वेळापूर्वीच घटनास्थळी भेट दिली. आत्तापर्यंत 17 जवानांची सुटका करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच 7 जवान अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.