नवी दिल्ली : काँग्रेसने नुकतीच महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती केली. तसेच 5 कार्यकारी अध्यक्षदेखील नेमले आहेत. महाराष्ट्राअगोदर छत्तीसगडमध्येदेखील नव्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. परंतु काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी 50 दिवसांपूर्वी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मग पक्षातील महत्त्वाचे निर्णय कोण घेत आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.


राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर पक्षाचे कामकाज कसे सुरु आहे? पक्षातील महत्त्वाचे निर्णय कोण घेत आहे? पक्षावर कोणाचे नियंत्रण आहे? असे अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधीच पक्षातील महत्त्वाचे निर्णय घेत आहेत.

बाळासाहेब थोरातांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्याची माहिती कांग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलद्वारे जाहीर करण्यात आली होती. ही नियुक्ती काँग्रेसच्या अध्यक्षांनी केली असल्याची माहिती त्या ट्वीटमध्ये देण्यात आली होती.

50 दिवस उलटूनही कॉंग्रेसला पक्षाध्यक्ष मिळेना, राहुल अद्याप राजीनाम्यावर ठाम 



याबाबत काँग्रेसच्या एका वरीष्ठ नेत्याने सांगितले की, राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला, तरी अद्याप तो मंजूर झालेला नाही. राजीनामा मंजूर होऊन नव्या अध्यक्षांची नियुक्ती होईपर्यंत राहुल गांधीच सर्व निर्णय घेतील. पक्षावर राहुल यांचेच नियंत्रण असेल.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी 25 मे रोजी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. 3 जुलै रोजी राहुल गांधी यांनी ट्विटरद्वारे राजीनाम्याबद्दल अधिकृतपणे माहिती जाहीर केली होती.