नवी दिल्ली : राजधानी दिल्ली आणि एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात थंडीची लाट पसरली आहे. राजधानीत तापमानाचा पारा चांगलाच घसरल्याने 10 जानेवारीपर्यंत दिल्ली जवळच्या नोएडामध्ये आठवी पर्यंतच्या शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत.

याशिवाय, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार आणि ओडिशासह संपूर्ण उत्तर आणि पूर्व भारतात थंडीचा जोर वाढला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमधील काही ठिकाणी दाट धुक्याची शक्यता आहे. तसेच पंजाब, हरियाणा, चंदीगढ, दिल्ली, उत्तर राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात, तसेच मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपूराच्या अनेक भागातीह दाट धुक्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

राजधानी दिल्लीचं तापमान आज कमाल 18 डिग्री ते किमान सात डिग्री सेल्सिअसवर राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. दाट धुक्यामुळे अनेक ट्रेन आणि विमान उड्डाणे उशिराने होत आहेत. दिल्लीला जाणाऱ्या 18 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर 49 ट्रेन उशीराने धावत आहेत. तसेच 13 एक्स्प्रेस ट्रेनची वेळही बदलण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.