Noida Flood : उत्तर प्रदेशातील गंगा आणि यमुना नदीनंतर आता हिंडन नदीच्या पाण्याचा स्तर वाढू लागला आहे. नदीचे पाणी नोएडातील रस्त्यांवर आल्याने पूर सदृश्य (Noida Flood) स्थिती निर्माण झाली आहे. नियोजित शहर समजले जाणारे नोएडा मान्सूनच्या (Monsoon) पावसात तग धरण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. एकाच वेळी शेकडो कार पाण्यात बुडाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगावे व्हायरल होऊ लागला आहे. 


हिंडन नदीच्या (Hindon River) पाण्याचा स्तर वाढल्याने नोएडाच्या इकोटेक 3 जवळचा परिसर पाण्याखाली गेला आहे. सुमारे 500 वाहने येथे अडकली आहेत. लोकांना रस्त्यावर येणे कठीण झाले आहे.


घरांमध्ये पुराचे पाणी


गौतम बुद्ध नगरचे जिल्हाधिकारी मनीष कुमार वर्मा यांनी सांगितले की, हिंडन नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे. हिंडन बॅरेजमधील धोक्याची पातळी 205.8 आहे. तर पाटबंधारे विभागाच्या म्हणण्यानुसार सध्या ते 201.5 इतके आहे. पूर सदृश्य स्थितीमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बचावकार्य सुरू केले आहे.


सेक्टर 143 मध्ये परिस्थिती बिघडली


एबीपी न्यूजशी संवाद साधताना, डीसीपी अनिल यादव आणि एसडीएम अंकित कुमार यांनी सांगितले की, हिंडन नदीतील पाण्याचा स्तर वाढल्याने नोएडाचा सखल भाग पाण्यात बुडाला आहे. सेक्टर 143 मधील हायराईज अपार्टमेंटला लागून असलेल्या जुन्या सुथियाना भागात पाणी साचले आहे. येथे अनेक वाहने पाण्यात बुडाली आहेत.


जिल्हाधिकाऱ्यांनी काय सांगितले?


गौतम बुद्ध नगरचे जिल्हाधिकारी मनीष कुमार वर्मा यांनी सांगितले की, गेल्या तीन दिवसांपासून हिंडन नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे. किनाऱ्याच्या ठिकाणाहून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. व्हायरल होत असलेला कार बुडालेला व्हिडीओ हा पूर आलेल्या गावातील आहे. जिथे एका खाजगी कॅब कंपनीच्या प्रांगणात खराब झालेली वाहने उभी होती. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एनडीआरएफची टीम घटनास्थळी तैनात असल्याची माहिती त्यांनी दिली. 


कामावर जाण्याची अपरिहार्यता


पूरसदृश्य स्थितीतही लोकांना कामावर जावे लागत आहे. एका व्यक्तीने एबीपी न्यूजला सांगितले की, अशा भयाण स्थितीतही कामावर जावे लागत आहे. मागील काही दिवसांपासून असेच पाणी साचले आहे. अनेकांना कामावर जाण्याशिवाय पर्यायच नसल्याचेही लोकांनी म्हटले. 


वृत्तसंस्था पीटीआयने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अनेक कार पाण्यात बुडाल्याचे दिसत आहे. जलप्रलयामुळे कारचा अर्धा भाग दिसत नाही. या ठिकाणी पोलिसही जवळपास तैनात असल्याचे दिसून आले आहे. 







स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले की, सगळीकडे पाणी साचले आहे. काही ठिकाणी 10 फूट, काही ठिकाणी 15 फूट पााणी साचले आहे. परिस्थिती बिकट असल्याचे त्यांनी म्हटले. घरातील सगळ्या वस्तू पाण्यात बुडाल्या आहेत. खाद्यपदार्थही पाण्याने खराब झाले असल्याचे त्यांनी म्हटले. अनेक विद्यार्थ्यांची पुस्तकेही वाहून गेली आहेत.