नवी दिल्ली : जुनं सोनं, जुन्या कार, दुचाकी यांच्या विक्रीवर कोणत्याही प्रकारचा जीएसटी आकारला जाणार नाही. मात्र, हा व्यवहार वैयक्तिक असावा. कारण व्यावसायिक हेतूने विक्रीचा व्यवहार असल्यास त्यावर जीएसटी आकारला जाईल. महसूल विभागाने यासंदर्भात परिपत्रक काढून स्पष्ट केले आहे.
जीएसटी लागू झाल्यापासून नागरिकांमध्ये अनेक गोष्टींमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. कोणत्या वस्तूंवर जीएसटी आणि कोणत्या गोष्टी जीएसटीमुक्त आहेत, याबाबत गोंधळ आहे. हाच संभ्रम जुनं सोनं आणि जुन्या कारच्या बाबतीत असल्याने महसूल विभागाचे सचिव हसमुख अढिया यांनी यंसदर्भात स्वत: स्पष्ट केले.
महसूल विभागाचे सचिव हसमुख अढिया यांनी सांगितले, “ग्राहकांकडून सराफ जुनं सोनं खरेदी केल्यावर त्यावर 3 टक्के रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम (RCM) आकारण्याची तरतूद जीएसटीमध्ये आहे. मात्र, सामान्य ग्राहकांनी सराफाला विकलेलं सोनं हा त्याचा व्यवसाय नसतो, हे स्पष्टीकरण महत्त्वाचं मानून जुन्या सोन्यावर जीएसटी आकारला जाणार नाही.”
तसेच, ज्याप्रकारे एखादी व्यक्ती जुनं सोनं सराफाला विकत असेल, तेव्हा जीएसटी लागू होणार नाही. त्याचप्रकारे, ग्राहकांकडून खरेदी केलेल्या जुन्या सोन्यावर सराफांनाही जीएसटी भरावा लागणार नाही.
जुन्या सोन्याच्या खरेदी-विक्रीबाबत जो जीएसटीचा नियम लागू आहे, तसाच नियम जुन्या कार आणि दुचाकींच्या खरेदी-विक्रीला लागू असेल, असे महसूल विभागाच्या सचिवांनी स्पष्ट केले आहे.
थोडक्यात ज्या व्यवहारात व्यावसायिक हेतू नाही, अशा व्यवहारावर जीएसटी आकारला जाणार नाही. मात्र, नोंदणीकृत नसलेल्या सोन्याच्या दागिन्यांचे सप्लायर जर नोंदणीकृत सप्लायरला सोनं विकत असतील, तर तो व्यावसायिक हेतू मानून त्यावर आरसीएम लागू होईल.
जुनं सोनं आणि जुन्या कारच्या विक्रीवर जीएसटी नाही!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Jul 2017 11:12 AM (IST)
जुनं सोनं किंवा जुन्या कार यांच्या विक्रीवर कोणत्याही प्रकारचा जीएसटी आकारला जाणार नाही. मात्र, हा व्यवहार वैयक्तिक असावा. कारण व्यावसायिक हेतून विक्रीचा व्यवहार असल्यास त्यावर जीएसटी आकारले जाईल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -