मुंबई : बिल्कीस बानो सामूहिक बलात्कार आणि तिच्या कुटुंबियांच्या हत्या प्रकरणात सत्र न्यायालयाचा निकाल मुंबई हायकोर्टानं कायम ठेवला आहे. जन्मठेपेच्या शिक्षेविरोधातली याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे. बिल्कीस बानो प्रकरणी एकूण 11 जणांना ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे.

सत्र न्यायलयानं निर्दोष ठरवलेल्या पाच जणांनाही मुंबई हायकोर्टानं दोषी ठरवलं आहे. तर 3 दोषींना फाशी देण्याची सीबीआयची मागणी हायकोर्टानं फेटाळली आहे. विशेष न्यायालयानं निर्दोष सोडलेल्या 6 पोलिसांनाही पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे.

2002 मध्ये गोध्रा हत्याकांडानंतर गुजरातमध्ये झालेल्या दंगली दरम्यान बिल्कीस बानोवर बलात्कार करुन तिच्या कुटुंबियांची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी बिल्कीस बानो 5 महिन्यांची गर्भवती होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा खटला महाराष्ट्राल्या हायकोर्टात वर्ग करण्यात आला होता.