चंदीगड (पंजाब) : लग्न मोडल्याची आजवर अनेक कारणं तुम्ही ऐकली असतील, पण हे कारण जरा हटके आहे. जरा नाही, जास्तच हटके आहे. जिथे नवरदेव फटके खाता-खाता वाचलाय. त्याचं झालं असं, स्वतःच्याच लग्नात नवरदेव दारू पिऊन आला आणि याच कारणामुळे मंडपातच लग्न मोडलं.


ही घटना आहे पंजाबमधली. दिनानगरच्या सुनिता सिंहनं दारुड्या नवऱ्याला भर लग्न मंडपात नाकारण्याचं धाडस दाखवलं. लग्नासाठी नवरदेवाची गाडी जशी मंडपाजवळ थांबली, तशा आपसूकच साऱ्यांच्या नजरा नवरदेवावर खिळल्या.

सुनिता सुद्धा आपल्या होणाऱ्या नवऱ्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. पण नवरा मुलगा गाडीतून खाली उतरला आणि चालू लागला, तेव्हा तिच्या डोळ्यातल्या आनंदाची जागा शंकेनं घेतली. कारण ऐन लग्नादिवशीच नवरदेवाची पावलं वाकडी पडत होती. आपल्या होणाऱ्या नवऱ्यानं मद्यप्राशन तर केलं नाही ना, अशी शंका सुनिताला आली आणि तिने याबद्दलची नाराजी व्यक्त केली.

पोरीनं धाडस केलं खरं, पण नवऱ्याकडचे काही हे मान्य करायला तयार नव्हते. नवऱ्याकडच्यांनी तर मुलाच्या पायाला दुखापत झाल्याची सबब पुढे केली. पण नवऱ्या मुलीने हे मान्य केलं नाही आणि मुलाची मद्य चाचणी करण्याची मागणी केली.

अखेर ते जवळच्या एका आरोग्य केंद्रावर चाचणी करण्यासाठी गेले. मात्र, तिकडे आवश्यक यंत्रणाच नसल्याने नवऱ्याने सुटकेचा निश्वास सोडला. पण नवरीबाई ऐकेल तर शपथ! तिने थेट मोर्चा खासगी आरोग्य केंद्राकडे वळवला आणि मद्य चाचणी करुनच घेतली.

नवरदेवाने मद्य प्राशन केलं असल्याचं अहवालानंतर स्पष्ट झालं आणि अखेर आपल्या होणाऱ्या नवऱ्याने मद्यप्राशन केलं असल्याचं पुराव्यानिशी साबित करत या नवरीने लग्न मोडलं. ती इथवरच थांबली नाही तर तिने नवऱ्याविरोधात पोलिसात तक्रारही दाखल केली.