मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयने रेपो दरात कोणतेही बदल केलेले नाहीत. त्यामुळे व्याजदर कपातीकडे डोळे लावून बसलेल्या कर्जदारांची निराशा झाली आहे.  यापूर्वी जाहीर केलेल्या द्वैमासिक पतधोरणात आरबीआयने पाव टक्क्यांनी कपात केली होती.

ऑगस्टमध्ये जाहीर केलेल्या पतधोरणात रेपो दर 6.50  टक्क्यांवरून 6.25 टक्क्यांवर आला होता. तर रिव्हर्स रेपो दर 6 टक्क्यांवरुन 5.75 टक्क्यांवर आला होता. यावेळीही हाच दर कायम ठेवण्यात आला आहे.

दरम्यान घसरलेल्या विकास दरावरुन सरकार अगोदरच चिंतेत असताना आता आरबीआयनेही त्याला दुजोरा दिला आहे. आरबीआयच्या ताज्या अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षात विकास दर 7.3 टक्क्यांऐवजी 6.7 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

महागाई वाढणार!

जीएसटी लागू झाल्यानंतर महागाई कमी होईल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र आरबीआयने हा अंदाज फेटाळला आहे. केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातली वाढ, खरीप उत्पादन घटण्याची शक्यता आणि शेतकरी कर्जमाफीमुळे महागाई वाढण्याचा अंदाज आरबीआयने वर्तवला आहे.

ग्राहकांकडून कमी झालेली मागणी, गुंतवणुकीतील मंदावलेला वेग आणि निर्यात कमी झाल्याने एकूण मागणी घटली आहे. जीएसटीमुळे पुन्हा एकदा निर्मिती क्षेत्रावर परिणाम झाला. शेती क्षेत्राची परिस्थिती स्थिर आहे. तर सेवा क्षेत्रामध्ये किंचित सुधारणा झाली आहे.

ऑगस्टमध्ये महागाई दर 3.2 टक्के होता. त्यामुळे या आर्थिक वर्षातील दुसऱ्या सहामाहीत महागाई दर चार ते साडे चार टक्क्यांपर्यंत असेल, असा अंदाज लावण्यात आला होता. मात्र हा दर आता 4.2 ते 4.6 टक्क्यांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. महागाई दर 2 ते 6 टक्क्यांच्या आत ठेवण्याचं उद्दीष्ट आहे.

रेपो दराचा तुमच्यावर काय परिणाम?

बँका रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेते, त्यावर रिझर्व्ह बँक जो व्याजदर आकारते, त्याला रेपो रेट म्हणतात.

जर रेपो रेट कमी झाला, तर बँकांना रिझर्व्ह बँकेला कमी व्याज द्यावं लागेल. त्यामुळे जर बँकांना फायदा झाला, तर बँका ग्राहकांनाही व्याजदर कपात करुन फायदा मिळवून देते.

रिव्हर्स रेपो

रिव्हर्स रेपो म्हणजे बँका आपला पैसा रिझर्व्ह बँकेत ठेवतात, त्यावर आरबीआय जो व्याजदर देते त्याला रिव्हर्स रेपो दर म्हणतात.

जर आरबीआयने दर कपात केली, तर बँकाही व्याजदरात कपात करतात. त्याचा परिणाम बँकेत पैसे सेव्हिंग करणाऱ्यांवर होतो.

रेपो रेट म्हणजे काय?


रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर.  रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं.म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्रहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात.  तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.

रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?


रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना आहे. बँका रिझर्व बँकेकडून कर्जरूपी पैसा घेतात, तसाच रिझर्व बँकही या वेगवेगळ्या बँकाकडून कर्जरूपाने पैसे घेत असते. तेव्हा त्यासाठी जो दर आकारला जातो, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.