नवी दिल्ली : दिल्लीच्या तीन मूर्ती भवनवर असलेल्या नेहरु मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीचं (Nehru Memorial Museum and Library) नाव आता अधिकृतपणे प्राईम मिनिस्टर म्युझियम अँड लायब्ररी (Prime Ministers Museum and Library) असं करण्यात आलं आहे. स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर नाव बदलाला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली. हा नाव बदल सोमवारपासून (14 ऑगस्ट) लागू झाला आहे. 


पीएम संग्रहालय आणि ग्रंथालयाच्या कार्यकारी परिषदेचे उपाध्यक्ष ए. सूर्य प्रकाश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर लिहिलं, "नेहरु मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी (NMML) 14 ऑगस्ट 2023 पासून पंतप्रधानांचे संग्रहालय आणि ग्रंथालय (PMML) सोसायटी आहे. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!" तसंच ए. सूर्यप्रकाश यांनी सांगितलं की, नामांतराची प्रक्रिया जूनमध्ये सुरु झाली आणि स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला हे काम पूर्ण झालं हा निव्वळ योगायोग आहे.






नाव बदलण्याचा निर्णय मागील वर्षी जूनमध्ये 


जून 2023 मध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत नेहरु मेमोरियल म्युझियमचं नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. आता त्याला औपचारिक स्वरुप देण्यात आलं आहे.


का बदललं नाव?


संस्थेचे नाव स्वतंत्र भारतातील लोकशाहीचा एकत्रित प्रवास आणि राष्ट्र उभारणीत प्रत्येक पंतप्रधानाचे योगदान दर्शवणाऱ्या नवीन संग्रहालयासह, चालू उपक्रमांचे प्रतिबिंब असावं, असं पीएम म्युझियम अँड लायब्ररीच्या कार्यकारी परिषदेला वाटत होतं. त्यानंतर नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. संग्रहालय आता अद्ययावत करण्यात आलं आहे.


काँग्रेसकडून जोरदार विरोध


नेहरु मेमोरियल म्यूजियमच्या नाव बदलाला काँग्रेसने भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. ज्यांचा कोणताही इतिहास नाही, ते दुसऱ्यांचा इतिहास मिटवत आहे. परंतु नाव बदलल्याने माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचं महत्त्व कमी होणार नाही, असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं होतं.


जेपी नड्डा यांचं उत्तर


मल्लिकार्जुन खरगे यांच्या वक्तव्यावर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही प्रत्युत्तर दिलं होतं. बिगर काँग्रसी नेतेही देशासाठी योगदान देत आहेत, हे काँग्रेसला पचवता येत नाही, असं ते म्हणाले होते. पीएम म्युझियम हा राजकारणाच्या पलिकडचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले होते.


माजी पंतप्रधान नेहरु यांचे शासकीय निवासस्थान


1929-30 दरम्यान बांधलेलं, तीन मूर्ती हाऊस यापूर्वी भारतातील कमांडर इन चीफचे अधिकृत निवासस्थान होते. स्वातंत्र्यानंतर ते तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचं अधिकृत निवासस्थान बनलं. नेहरु 1964 मध्ये त्यांच्या निधनापर्यंत सुमारे 16 वर्षे इथे राहिले. त्यानंतरच्या सरकारने नेहरुंना समर्पित या इमारतीत संग्रहालय आणि ग्रंथालय बांधण्याचा प्रस्ताव दिला. यानंतर नेहरु मेमोरियल म्युझियमचे उद्घाटन करुन एनएमएमएल सोसायटीची स्थापना करण्यात आली.


हेही वाचा


नेहरुंच्या स्मृतींनी ओळखल्या जाणाऱ्या वास्तूमध्ये आता आजवरच्या सर्व पंतप्रधानांचं संग्रहालय!