नवी दिल्ली : देशातल्या आजवरच्या पंतप्रधानांचं एकत्रित संग्रहालय...दिल्लीतल्या तीन मूर्ती भवनमध्ये 14 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं लोकार्पण होणार आहे. 2018 मध्ये पंतप्रधान मोदींनी या संग्रहालयाची घोषणा केली होती. देशात केवळ मोजक्याच पंतप्रधानांचं महत्त्व अधोरेखित केलं जातं, इतरांच्या कामाची मात्र तितकीशी दखल घेतली जात नाही, अशी खंत व्यक्त करत मोदींनी याची गरज बोलून दाखवली होती. 


तीन मूर्ती भवन...हे दिल्लीत आजवर ओळखलं जातं ते नेहरु मेमोरियलसाठी. पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात याच वास्तूमध्ये पंडित जवाहरलाल नेहरुंनी आपला जीवनकाळ व्यतीत केला. त्यानंतर याच वास्तूमधे त्यांचं एक संग्रहालयही उभं राहिलं. आता इतर सर्व पंतप्रधानांसाठीचं संग्रहालय नेहरुंच्याच नावाने असलेल्या या वास्तूमध्ये उभं राहणार आहे. 


एकट्या नेहरुंऐवजी आता सर्व पंतप्रधानांचं संग्रहालय -


- 1930 साली ब्रिटीशांनी तीन मूर्ती भवनची ही वास्तू उभारली होती.
- 10 हजार स्क्वेअर मीटर इतक्या विस्तीर्ण आवारात हे संग्रहालय उभं राहणार आहे.
- नेहरु मेमोरियल आणि लायब्ररी ही वास्तू सध्या इथे आहे
- 273 कोटी रुपये खर्च करुन आता देशातल्या सर्व पंतप्रधानांच्या आठवणी जपणारं म्युझियम इथे साकारलं जाईल
- पंतप्रधानांच्या भेटी, लेख, दुर्मिळ ऑडिओ, व्हिडीओ याचं एकत्रिकरण यात असेल असं सांगितलं जात आहे. 


2018 मध्येच या संग्रहालयाचं काम पूर्ण झालं होतं. त्यानंतर याचं उद्घाटन कुठल्या तारखेला करायचं यााबाबतही विचार सुरु होता. 25 डिसेंबर, अटल बिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस की 26 जानेवारी अशा दोन तारखांचाही प्रस्ताव पुढे आला होता. पण आता 14 एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा मुहूर्त साधत हे उद्घाटन होणार आहे. 


देशातल्या आजवरच्या सर्व पंतप्रधानांचं एकत्रित संग्रहालय असायलाच हवं. पण सोबतच ते करण्यासाठी नेहरु मेमोरियलची जागा निवडून मोदींनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. इंडिया गेटवरच्या मेघडंबरीत सुभाष चंद्र बोस यांचा पुतळा बसवण्यामागे जी प्रतिकात्मकता होती तशीच आता या वास्तूमध्ये नेहरुंऐवजी सर्व पंतप्रधानांना समान संधी देण्यातही आहे.