Navneet Rana on Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar PM Nitish Kumar) यांनी महिलांचं शिक्षण (Women Education) आणि लोकसंख्या (Population) याबाबत बोलताना काही वेगळंच बरळून गेले. यावरून आता रणकंदन माजलं आहे. नितीश कुमार यांनी देशातील महिलांचा अपमान केल्याचं म्हणत, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी संताप व्यक्त केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानभवनात असे शब्द वापरणे म्हणजे संपूर्ण देशभरातील महिलांचा अपमान आहे, अशी तिखट प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली आहे.


नितीश कुमार यांचं 'सेक्स ज्ञान'


'बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी संपूर्ण देशभरातील महिलांचा केला अपमान आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जाणून बुजून असं राजकीय वक्तव्य केलं आहे. यानंतर कोणत्याही राजकीय पक्षांनी त्यांना साथ देऊ नये. 75 वर्षाच्या व्यक्तीने असे अपशब्द काढल्याने संपूर्ण देशभरातील महिलांनी रस्त्यावर उतरले पाहिजे. महिलांबद्धल आधी विधान करायचं आणि नंतर माफीनामा काढायचा', असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. नितीश कुमार यांनी माफी नाही, तर राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे.


बिहारच्या मुख्यमंत्र्यांचं महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य


बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी विधानसभेत लोकसंख्या नियंत्रणावर दिलेल्या वक्तव्यावरुन गदारोळ पाहायला मिळत आहे. महिला आयोगापासून ते सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्व स्तरांतून नितीश कुमार यांचा निषेध केला जात आहे. राष्ट्रीय महिला आयोग (NCW-National Commission for Women) ने नितीश कुमार यांना तत्काळ देशातील महिलांची माफी मागण्यास सांगितलं आहे. सोशल मीडियावरही त्यांच्या या वक्तव्यावर जनला प्रचंड संताप व्यक्त करत आहेत.


नेमकं काय म्हणाले नितीश कुमार? पाहा व्हिडीओ






आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मागितली माफी


लोकसंख्या नियंत्रणाबाबत केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी माफी मागितली आहे. तुम्हाला दुखावले असेल तर मी माफी मागतो, असे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले. मी बिहारमध्ये शिक्षणासाठी इतका पैसा निश्चित केला आणि मुलींना शिकवायला सुरुवात केली, असे मुख्यमंत्री म्हणाले. माझ्या मनातून काही शब्द निघाले, मी पुरुष आणि स्त्रीबद्दल माफी मागतो. मुख्यमंत्र्यांनी माफी मागितल्यानंतरही भाजप माफ करायला तयार नाही. या विधानानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.