नितीश कुमार म्हणाले की, ''शरद यादव आपला निर्णय घेण्यास स्वतंत्र असून, पक्षाने सर्वसहमतीने याबाबतचा निर्णय घेतला आहे.''
यापूर्वी शरद यादव दिल्लीतून पाटण्यात दाखल झाल्यानंतर, आपण महायुतीसोबत असल्याचं वक्तव्य केलं होतं. तसेच बिहारच्या 11 कोटी जनतेने 2015 च्या विधानसभा निवडणुकीत पाच वर्षांसाठी महायुतीला जनादेश दिला होता, असं म्हणतं नितीश कुमारांना घरचा आहेर दिला होता.
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या संपत्तीवरील सीबीआयच्या छापेमारीनंतर, नितीश कुमारांनी 26 जुलै रोजी स्वत: च आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. पण दुसऱ्याच दिवशी म्हणजे, 27 जुलै रोजी भाजपसोबत युती करत, पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर, आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या भेटीत बिहारच्या विकासासंबंधी विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच यानंतरही आपण पुन्हा मोदींच्या भेटीसाठी दिल्लीत येणार असल्याचं, माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.
दुसरीकडे राजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी जेडीयूमधील फुटीवरुन नितीश कुमारांवर निशाणा साधला होता. नितीश कुमारांनी शरद यादव यांना धोका दिल्याचं सांगत, शरद यादव पाटण्याला आल्यानंतर जदयूचे कार्यकर्ते त्यांचा विरोध करतील आणि नितीश कुमारांच्या इशाऱ्यावर त्यांच्यावर हल्लाही होऊ शकतो, असा आरोप लालू यादव यांनी केला होता. त्यांच्या पक्षाची शरद यादव यांच्या जेडीयूशी युती कायम राहिल, असंही लालू म्हणाले होतं.