नवी दिल्ली: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज महाराष्ट्रातील 25 हजार कोटींच्या प्रकल्पांचा आढावा घेतला.


महाराष्ट्रातील विविध आमदार-खासदारांशी चर्चा करत, गडकरींनी अनेक प्रकल्पांची घोषणा केली.

यामध्ये मुंबई-गोवा हायवेसाठी 18 हजार कोटी, कल्याण- ठाणे-मुंबई जलमार्ग, औरंगाबाद-जालना मार्गाला मंजुरी, ठाणे-भिवंडी 8 पदरी करणार इत्यादी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या.

या बैठकीसाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मदन येरावार,  कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक, अकोल्याचे भाजप खासदार संजय धोत्रे, शिवसेनेचे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरेही उपस्थित होते.

कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतूक

या बैठकीत कल्याण-ठाणे-मुंबई असा जलवाहतुकीचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. त्याबाबत लवकरच टेंडर काढण्यात येणार आहे.

या प्रकल्पासाठी 2 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यातील पहिले 500 कोटीचे टेंडर काढले जातील. तर 1 हजार कोटी केंद्र सरकार आणि 1 हजार कोटी महापालिका खर्च करेल.

ठाणे -भिवंडी

ठाणे -भिवंडी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात एनएचएआयद्वारे करण्यात येणार आहे. ठाणे भिवंडी बायपास (नाशिक) 8 पदरी करणार. यासाठी 1 हजार कोटीची तरतूद आहे. याचं टेंडर 1 महिन्यात काढण्यात येईल.

मुंबई-गोवा महामार्गाला 18 हजार कोटी

यावेळी मुंबई- गोवा महामार्गासाठी 18 हजार कोटींची तरतूद करण्यात आली. मात्र अद्याप 60 टक्के भू संपादन झालेलं नाही. याचं स्ट्रक्चरल काम सुरु असल्याचं सांगण्यात आलं.

सातारा – कोल्हापूर सहापदरी

सातारा –कोल्हापूर- कागल या सहापदरी महामार्ग करायचा आहे. यासाठी तीन हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय या बैठकीत झाला. यासाठी एक महिन्यात टेंडर काढण्यात येणार आहे, तर तीन महिन्यात काम सुरु करण्यात येणार आहे.

औरंगाबाद-जालना रस्त्याला मंजुरी

या बैठकीत औरंगाबाद - जालना रस्त्याला मंजुरी देण्यात आली. तर जालना -चिखली हा रस्ता चौपदरीकरण करण्यात येईल.