नवी दिल्ली : राज्यसभेचे खासदार असलेले मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री रेखा यांच्या अनुपस्थितीवरुन राज्यसभेत गोंधळ झाला. जर सचिन आणि रेखाला राज्यसभेत यायचंच नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांचं निलंबन करावं, अशी मागणी समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी केली.

रेखा आणि सचिन यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा, अन्यथा विजय माल्ल्याप्रमाणे संसदेनंच दोघांना निलंबित करावं अशी मागणी नरेश अग्रवाल यांनी केली. मार्च महिन्यातही अग्रवाल यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.

क्रीडा, चित्रपट अशा विविध क्षेत्रातील 12 मान्यवरांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात येते. मात्र ते वारंवार अनुपस्थित राहत असल्यास, त्यांना या क्षेत्रात रस नसावा. त्यामुळे अशा व्यक्तींनी राजीनामा द्यावा, असं अग्रवाल म्हणाले.

'सचिन-रेखा राजीनामा का देत नाहीत?' राज्यसभेत खासदाराचा सवाल


2012 मध्ये रेखा आणि सचिन तेंडुलकरची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर जवळपास 348 दिवसांपैकी सचिनने 23 तर रेखाने केवळ 18 दिवस सदनात हजेरी लावली. पावसाळी अधिवेशनातही दोघांनी उपस्थिती लावली नाही. गेल्या बजेट सेशनमध्ये (31 जानेवारी 2017 ते 9 फेब्रुवारी 2017) दोघांनी केवळ एक-एक दिवस हजेरी लावली.

कला, साहित्य, विज्ञान, सामाजिक शास्त्र अशा विविध क्षेत्रातील 12 सदस्यांचं राज्यसभेचं खासदार म्हणून नामांकन करण्यात येतं. रेखा, सचिन तेंडुलकर यांच्याशिवाय अनु आगा, संभाजी छत्रपती, स्वपन दासगुप्ता, रुपा गांगुली, नरेंद्र जाधव, एमसी मेरी कोम, के पारासरन, गोपी सुरेश, सुब्रह्मण्यम स्वामी आणि केटीएस तुलसी यांचा समावेश आहे.