नवी दिल्ली : आर्थिक मंदीनंतर आता कांदा दरवाढीवरुन मोदी सरकारला घेरण्याची तयारी काँग्रेसनं केली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार संसद परिसरात आंदोलन करणार आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या नेतृत्वात हे आंदोलन होईल. यंदा कांद्याचं उत्पन्न घटल्यामुळे कांद्याचे दर वाढले आहेत. त्यावर उपाय म्हणून केंद्र सरकारनं 21 हजार मेट्रिक कांदा आयात करण्याचा निर्णय घेतलाय.


कांदा दरवाढीवरुन देशभरात संतापाचं वातावरण दिसून येत आहे. 20 रुपये किलोचा कांदा आता तब्बल दीडशे रुपये प्रतिकिलोनं खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं आता देशात कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तीन जागतिक टेंडर काढण्यात आले आहेत. कांद्याची आयात करण्यासाठी तुर्की आणि युरोपियन युनियनकडे प्रत्येकी 5 हजार मेट्रिक टन कांद्याचं टेंडर तर, एक जागतिक टेंडर काढण्यात आलेलं आहे. कांदा आयातीच्या या नव्या टेंडरमुळे अनेक अटीही आता केंद्र सरकारनं शिथिल केल्या आहेत. त्यात होलसेलरना 25 मेट्रिक टन आणि रिटेलरसाठी 5 मेट्रिक टन कांदा साठवणुकीची परवानगी देण्यात आली आहे.

पाहा व्हिडीओ : Explainer Video | कांद्याच्या किमती गगनाला भिडतायेत मात्र शेतकऱ्यांचे हात रितेच | ABP Majha




दरम्यान, आयात करण्यात आलेला कांदा पुढच्या दोन दिवसांमध्ये 1 हजार मेट्रिक टन कांदा दाखल होत आहे. 12 डिसेंबरपर्यंत 3 हजार मेट्रिक टन कांदा जेएनपीटीमध्ये दाखल होणार आहे. 8 हजार मेट्रिक टन कांदा दहा जानेवारीपर्यंत दाखल होईल. तसेच देशाची रोजची कांद्याची गरज 50 हजार मेट्रिक टन आहे. सध्या देशात फक्त 20 हजार मेट्रिक टन कांदा उपलब्ध आहे, त्यामुळेच कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. अशातच परदेशातून आयात केलेल्या कांद्याला ४५ ते ५० रुपये भाव देण्यात येणार आहे.


मी कांदा-लसूण खात नाही : अर्थमंत्री निर्मला सीतारमन

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कांद्याच्या वाढत्या दरावर काल लोकसभेत मांडलेल्या भूमिकेमुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. सीतारमन कांदा दरवाढीच्या मुद्यावर बोलताना म्हणाल्या की, 'कांदा दरवाढीनं व्यक्तिगत आयुष्यात काही परिणाम झालेला नाही. शिवाय, आपण कांदा-लसूण खात नाही आणि कुटुंबालाही कांदा-लसूण आवडत नाही' अर्थमंत्र्यांचं हे वक्तव्य ऐकताच खासदारांमध्ये हशा पिकला. सरकारकडून कांदा दरवाढ रोखण्यासाठी घेण्यात येत असलेल्या निर्णयांची माहिती त्या संसदेत देत होत्या. दरम्यान, देशात वाढणाऱ्या कांद्याच्या दरवाढिवर खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारला प्रश्न विचारले. तुम्ही कांदा खाता का, असा सवाल सुळेंनी विचारला असता, त्यावर उत्तर देताना केंद्रीय अर्थमंत्री यांनी हे उत्तर दिलं.

संबंधित बातम्या : 

महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचणारा कांदा येतो कुठून?

कांदा रडवणार! आवक घटल्याने रिटेल मार्केटमध्ये कांदा 130 रुपयांवर जाण्याची शक्यता