नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत सात वर्षांपूर्वी झालेल्या निर्भया बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणी आज न्याय मिळाला आहे. निर्भयाच्या चारही दोषींना तिहार जेलमध्ये फाशी देण्यात आली. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत दिल्ली हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टातपर्यंत दोषीच्या वकिलांनी फाशी टाळण्यासाठी सगळे प्रयत्न केले, पण त्यांना यश आलं नाही. दिल्ली हायकोर्टाकडून दोषींना दिलासा मिळाला नाही, यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं.

निर्भयाच्या कुटुंबाला न्यायासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागली. सात वर्ष, तीन महिने आणि तीन दिवसांनी दोषींना निर्भयाला न्याय मिळाला. नजर टाकूया हे चार जण फाशीपर्यंत कसे पोहोचले?

Nirbhaya Case | अखेर लटकले, निर्भयाच्या चारही दोषींना तिहार जेलमध्ये फाशी

पाशवी कृत्य ते फाशी

16 डिसेंबर, 2012 : दिल्लीच्या मुनीरकामध्ये सह जणांनी चालत्या बसमध्ये पॅरामेडिकलच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणात दुष्कृत्याच्या सर्व मर्यादा पार झाल्या. घटना घडली त्यावेळी निर्भयाचा मित्रही बसमध्ये होता. नराधमांनी त्यालाही जबर मारहाण केली. यानंतर निर्भया आणि तिच्या मित्राला चालत्या बसमधून रस्त्यावर फेकून दिलं.

18 डिसेंबर, 2012 : दिल्ली पोलिसांनी चार दोषी (त्यावेळी आरोपी) राम सिंह, मुकेश, विनय शर्मा आणि पवन गुप्ता या चौघांना अटक केली.

21 डिसेंबर, 2012 : पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला दिल्लीतून आणि सहावा दोषी अक्षय ठाकूरला बिहारमधून अटक केली.

29 डिसेंबर, 2012 : तरुणीवर दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला सिंगापूरच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे उपचारादरम्यान तरुणीची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

3 जानेवारी, 2013 : पोलिसांनी पाच सज्ञान दोषींविरोधात (त्यावेळी आरोपी) हत्या, सामूहिक बलात्कार, हत्येचा प्रयत्न, दरोड्याचा गुन्हा नोंदवल्यानंतर आरोपपत्र दाखल केलं.

17 जानेवारी, 2013 : फास्ट ट्रॅक कोर्टाने पाच दोषींवर आरोप निश्चित केले.

11 मार्च 2013 : याचदरम्यान तिहार जेलमध्ये राम सिंहने आत्महत्या केली.

Nirbhaya Case | आजचा दिवस देशातील सर्व महिलांना समर्पित; निर्भयाच्या आईवडिलांची प्रतिक्रिया

31 ऑक्टोबर, 2013 : ज्युवेनाईल बोर्डाने अल्पवयीन आरोपीला गँगरेप आणि हत्या प्रकरणी दोषी ठरवलं. त्याची रवानगी तीन वर्षांसाठी बालसुधारगृहात करण्यात आली.

10 सप्टेंबर, 2013 : फास्ट ट्रॅक कोर्टाने मुकेश, विनय, पवन आणि अक्षयला दोषी ठरवलं.

13 सप्टेंबर, 2013 : कोर्टाने चारही दोषी मुकेश, विनय, पवन आणि अक्षयला फाशीची शिक्षा ठोठावली.

13 मार्च, 2014 : दिल्ली हायकोर्टाने चारही दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवली.

15 मार्च, 2014 : सुप्रीम कोर्टाने दोषीच्या फाशीला स्थगिती दिली.

20 डिसेंबर, 2015 : अल्पवयीन गुन्हेगाराची बालसुधारगृहातून सुटका झाली. यावरुन देशात विरोधही पाहायला मिळाला.

27 मार्च, 2016 : सुप्रीम कोर्टाने दोषींच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला.

5 मे, 2017 : सुप्रीम कोर्टाने चारही दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवली.

9 नोव्हेंबर, 2017 : दोषी मुकेशने सुप्रीम कोर्टात फाशीच्या शिक्षेविरोधात फेरविचार याचिका दाखल केली. परंतु सुप्रीम कोर्टाने ती फेटाळली

डिसेंबर, 2019 : सुमारे अडीच वर्षानंतर दोषी अक्षयच्या वतीने सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यात आली.

डिसेंबर, 2019 : निर्भयाच्या आईकडूनही सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह याचिकेविरोधात याचिका दाखल करण्यात आली.

7 जानेवारी, 2020 : दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने चारही दोषींना 22 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता फासावर लटकवण्याचा डेथ वॉरंट जारी केला.

8 जानेवारी, 2020 : पवन गुप्ताने सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली. यानंतर मुकेशने क्युरेटिव्ह याचिका दाखल केली.

14 जानेवारी, 2020 : मुकेशने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दयेचा अर्ज केला, परंतु राष्ट्रपतींनी ती फेटाळली. दया याचिकेच्या प्रक्रियेमुळए फाशीची तारीख टळली. आणि 1 फेब्रुवारी सकाळी 6 वाजता फाशीची नवी तारीख आणि वेळ निश्चित झाली.

30 जानेवारी, 2020 : एक-एक करुन पवन, अक्षय आणि विनयने कायदेशीर डावपेच खेळले. यानंतर पटियाला हाऊस कोर्टाने 3 मार्चचं डेथ वॉरंट जारी केलं.

2 मार्च, 2020 : पवन गुप्ताने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली. परिणामी 3 मार्चची तारीखही रद्द झाली. मग फाशीसाठी नवी तारीख 20 मार्च निश्चित झाली.

19 मार्च, 2020 : निर्भयाच्या दोषींचे वकील एपी सिंह यांनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली. मात्र हायकोर्टाने रात्री 12 वाजता याचिका फेटाळाली.

20 मार्च 2020 : वकील एपी सिंह रात्री उशिरा सुप्रीम कोर्टात पोहोचले. रात्री अडीच वाजता विशेष खंडपीठाने सुनावणीला सुरुवात केली. सुमारे एक तास सुनावणी सुरु होती. त्यानंतर कोर्टाने याचिका फेटाळली, ज्यामुळे पहाटे साडेपाच वाजता फाशी देणार हे निश्चित झालं. अखेर पहाटे साडेपाच वाजता दोषींना फासावर लटकवण्यात आलं.