नवी दिल्ली : आज तब्बल सात वर्षांच्या प्रतिक्षेनंतर निर्भयाच्या चारही दोषींना फासावर लटकवण्यात आलं आहे. दोषींना फासावर लटकवण्यात आल्यानंतर निर्भयाचे आईवडिल म्हणाले की, अखेर आज आमच्या मुलील न्याय मिळाला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, 'यामुळे महिला सुरक्षेबाबत सर्वांच्या मनात एक विश्वास निर्माण झाला आहे. आम्ही न्यायासाठी लढाई लढली आणि न्याय मिळाला.'


संपूर्ण देशासाठी खुप मोठा दिवस : निर्भयाचे वडिल बद्रीनाथ सिंह


मुलीच्या अपराध्यांना फासावर लटकवल्यानंतर निर्भयाचे वडिल बद्रीनाथ सिंह म्हणाले की, 'आम्ही या क्षणाची गेल्या सात वर्षांपासून वाट पाहत होतो. आम्हाला खूप आनंद झाला आहे. आज न्यायाचा दिवस आहे. फक्त आमच्यासाठी नाहीतर संपूर्ण देशासाठीच, महिला सुरक्षेबाबत आज एक विश्वास निर्माण झाला आहे. आज निर्भया खरचं आनंदी असेल. एक मुलगी तेव्हाच आनंदी असते, जेव्हा तिचे आई-वडिल आनंदी असतात. त्यामुळे आज निर्भया आनंदी असेल. आज तिच्या आत्म्याला नक्कीच शांती मिळेल. आमची मागणी आहे की, महिला सुरक्षेबाबत कठोरातील कठोर कायदे करा, जेणेकरून कोणत्याच आई-वडिलांना आमच्याप्रमाणे न्यायासाठी वाट पाहावी लागणार नाही.'


Nirbhaya Case | अखेर लटकले, निर्भयाच्या चारही दोषींना तिहार जेलमध्ये फाशी


आजचा दिवस देशाच्या महिलांचा आहे : निर्भयाची आई आशा देवी


मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फासावर लटकवल्यानंतर निर्भयाची आई आशा देवी म्हणाल्या की, 'अखेर आज त्यांना फासावर लटकवण्यात आलं, आजचा दिवस आमच्या मुलीचा आणि देशातील प्रत्येक महिलेचा. ज्याप्रकारे दोषींच्या वतीने एक एक याचिका दाखल करण्यात आली, पण न्यायालयाने त्या फेटाळून लावल्या. आजचा दिवस खरचं खूप मोठा आहे. कुठे ना कुठे या खटल्यामुळे आपल्या कायदेव्यवस्थेतील काही त्रुटी समोर आल्या. तर अनेकदा आपल्या संविधानावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. परंतु, आज संविधान आणि कायद्यामुळेच मला न्याय मिळाला आहे. यामुळे देशभरातील महिलांच्या मनात आपल्या संविधानाबाबत आणि कायदेप्रणालीबाबत विश्वास निर्माण होणार आहे.'


आईचा धर्म मी निभावला : निर्भयाची आई आशा देवी


आशा देवी बोलताना म्हणाल्या की, 'आमची मुलगी आज या जगात नाही, ती आता पुन्हा येऊही शकत नाही, परंतु आजपासून या देशातील सर्व मुलींच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. आम्हाला न्याय मिळाला आहे. परंतु, आमची लढाई देशातील इतर मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी असेल. काल जेव्हा आम्ही न्यायालयातून घरी परतलो, तेव्हा आम्ही तिच्या फोटोसमोर हात जोडले आणि तिचा फोटोला मिठी मारली. मला माझ्या मुलीचा गर्व आहे. तिच्या नावाने मला अख्खं जग ओळखत आहे. मला एकच खंत आहे की, मी तिला वाचवू शकले नाही, परंतु आज ममता आणि आईचा धर्म निभावला आहे.'


पाहा व्हिडीओ : #NirbhayaCase निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना 20 मार्चला फाशी, पटियाला हाऊस कोर्टाचं नवं 'डेथ वॉरंट'



काय आहे निर्भया गँगरेप प्रकरण?
- सात वर्षांपूर्वी म्हणजेच 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत 23 वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला होता.
- सिनेमा पाहून आल्यानंतर मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय सहा जण होते.
- त्यांनी निर्भयासोबत छेडछाड करायला सुरुवात केली. विरोध केल्याने आरोपींनी तिच्या मित्राला एवढी मारहाण केली की तो बेशुद्ध झाला.
- यानंतर एकटीच असलेल्या निर्भयावर सहा नराधमांनी धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला. एवढंच नाही तर अनन्वित अत्याचार केले.
- तरुणीला गंभीर जखमी केल्यानंतर नराधमांनी दोघांना दक्षिण दिल्लीच्या महिपालपूरजवळच्या वसंत विहार परिसरात धावत्या बसमधूनच रस्त्यावर फेकलं.
- दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
- मात्र 29 डिसेंबर रोजी उपचारांदरम्यान माऊंट एलिझाबेथ रुग्णालयातच तिने अखेरचा श्वास घेतला.