नवी दिल्ली : 7 वर्ष, 3 महिने 3 दिवसांनी दिल्लीतील निर्भयाला अखेर न्याय मिळाला आहे. आज (20 मार्च) पहाटे साडेपाच वाजता दिल्लीच्या तिहारच्या जेल क्रमांक तीनमध्ये चारही नराधमांना फासावर लटकवण्यात आलं. मुकेश सिंह, अक्षय ठाकूर, विनय शर्मा आणि पवन गुप्ताला फाशी देण्यात आली. एकाच वेळी चारही दोषींना फाशी देण्याची ही जेलच्या इतिहासातील पहिलीच घटना असल्याचं तिहार जेलच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं.
दोषींना फासावर लटकवल्यानंतर डॉक्टरांचं पथक जेलमध्ये जाऊन चारही दोषींचा मृत्यू झाल्याची पुष्टी करतील. त्यानंतर दोषींचे मृतदेह दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले जातील. मग दिन दयाल उपाध्याय रुग्णालयात त्यांचं शवविच्छेदन केलं जाईल.
आजचा दिवस देशाच्या मुलींच्या नावे : निर्भयाची आई
निर्भयाला अखेर न्याय मिळाला आहे. यासाठी मी न्यायव्यवस्था आणि भारत सरकारचे आभार मानते. आजचा दिवस देशातील महिला आणि मुलींच्या नावे समर्पित आहे. आम्ही फाशीचा आनंद साजरा करणार नाही. पण मी हे जरुर सांगेन की या फाशीनंतर आता गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने दिली.
फाशीच्या काही तास आधी दोषीनी पुन्हा एकदा कायदेशीर डावपेच खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आलं नाही. दोषींचे वकील एपी सिंह यांनी फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली. परंतु ती फेटाळण्यात आली. यानंतर एपी सिंह सुप्रीम कोर्टात गेले, मात्र देशाच्या सर्वोच्च न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळली.
पहाटे सव्वा तीन वाजता चारही दोषींना उठवण्यात आलं. पण त्यांना रात्रभर झोप लागली नाही.
काय आहे निर्भया गँगरेप प्रकरण?
- सात वर्षांपूर्वी म्हणजेच 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत 23 वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला होता.
- सिनेमा पाहून आल्यानंतर मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय सहा जण होते.
- त्यांनी निर्भयासोबत छेडछाड करायला सुरुवात केली. विरोध केल्याने आरोपींनी तिच्या मित्राला एवढी मारहाण केली की तो बेशुद्ध झाला.
- यानंतर एकटीच असलेल्या निर्भयावर सहा नराधमांनी धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला. एवढंच नाही तर अनन्वित अत्याचार केले.
- तरुणीला गंभीर जखमी केल्यानंतर नराधमांनी दोघांना दक्षिण दिल्लीच्या महिपालपूरजवळच्या वसंत विहार परिसरात धावत्या बसमधूनच रस्त्यावर फेकलं.
- दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
- मात्र 29 डिसेंबर रोजी उपचारांदरम्यान माऊंट एलिझाबेथ रुग्णालयातच तिने अखेरचा श्वास घेतला.