औरंगाबाद (उत्तर प्रदेश) : दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडातील दोषी अक्षय ठाकूरची पत्नी पुनीताने त्याला फाशीपासून वाचवण्यासाठी कायदेशीर खेळी खेळली आहे. पुनीताने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. पुनीताने आपल्या अर्जात म्हटलं आहे की, मला विधवा बनून राहायचं नाही. अक्षयच्या पत्नीने औरंगाबाद कौटुंबिक न्यायायलयाचे न्यायाधीश रामलाल शर्मा यांच्या कोर्टात अर्ज दाखल केला आहे. अर्जात म्हटलं आहे की, "माझ्या पतीला बलात्काराच्या प्रकरणात दोषी ठरवलं आहे आणि त्याला फाशी देण्यात येणार आहे. परंतु तो निर्दोष आहे. त्यामुळे मला त्याची विधवा बनून राहायचं नाही."
अक्षयच्या पत्नीची कायदेशीर खेळी?
अक्षयच्या पत्नीचे वकील मुकेश कुमार सिंह यांनी सांगितलं की, "हिंदू विवाह कायदा १३ (२) (II) अंतर्गत काही खास प्रकरणात घटस्फोटाचा अधिकार आहे, या प्रकरणांमध्ये बलात्काराचाही समावेश आहे. जर बलात्काराच्या प्रकरणात एखाद्या महिलेच्या पतीला दोषी ठरवलं तर ती घटस्फोटासाठी अर्ज दाखल करु शकते."
अक्षयसह चार दोषींना 20 मार्च रोजी फाशी
या प्रकरणातील चार दोषींना २० मार्च रोजी पहाटे साडेपाच वाजता फाशी देण्यात येणार आहे. अक्षयने फाशीपासून वाचण्यासाठी अनेक मार्ग वापरले होते. परंतु कनिष्ठ कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत त्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही अक्षयची दया याचिका फेटाळली आहे. निर्भयाचे दोषी अक्षय, पवन, मुकेश आणि विनय यांचे सर्व कायदेशीर रस्ते बंद झाले आहेत.
तिहारच्या जेल क्रमांक 3 मध्ये बंद या चौघांना सध्या तरी कुटुंबीयांची भेट घेण्यास अद्याप बंद केलेलं नाही. पण त्यांची अखेरची भेट आता १९ मार्च रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच होऊ शकते. यानंतर त्यांना कोणाचीही भेट घेऊ दिली जाणार नाही.
दोषींची आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद
निर्भया गँगरेप आणि हत्या प्रकरणातील चारपैकी तीन दोषींनी फाशी टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. दोषी अक्षय, पवन आणि विनयने आंतरराष्ट्रीय कोर्टात अर्ज दाखल केला आहे. तिन्ही दोषींनी आयसीजेला पत्र लिहून फाशी टाळण्याची विनंती केली आहे. दोषींचे वकील एपी सिंह यांनी म्हटलं आहे की, फाशीच्या शिक्षेविरोधात जगभरातील विविध संघटनांनी आयसीजेचं दार ठोठावलं आहे.