नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेत 13 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून फरार झालेल्या हिरा व्यापारी नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणास ब्रिटनच्या गृहमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. ही माहिती सीबीआय अधिकाऱ्यांनी दिली आहे. पंजाब नॅशनल बँकेकडून (पीएनबी) फसवणूकीच्या प्रकरणात हिरे व्यापारी नीरव मोदी यांना अटक करण्यात आली आहे. नीरव मोदी सध्या लंडनच्या तुरूंगात आहेत.
काही दिवसांपूर्वीच नीरव मोदीला भारतात प्रत्यार्पण केले जाणार असल्याचा निकाल ब्रिटनमधील कोर्टाने दिला होता. कोर्टाने म्हटले होते की, नीरव मोदी प्रकरण प्रत्यार्पण कायद्याच्या कलम 137 च्या सर्व अटी पूर्ण करते. वेस्टमिन्स्टर कोर्टाने नीरव मोदीकडून भारतात सरकारी दबाव, मीडिया ट्रायल्स आणि न्यायालयांची कमकुवत स्थिती सांगून प्रत्यार्पण टाळण्यासाठी केलेली याचिका फेटाळली आहे.
नीरव मोदीची मानसिक स्थिती व प्रकृती प्रत्यार्पणासाठी योग्य नसल्याचा दावाही लंडन कोर्टाने फेटाळून लावला. आर्थर रोडच्या बॅरेक 12 मध्ये नीरव मोदीला ठेवण्यात येणार असल्याच्या आश्वासनांनाही न्यायालयाने समाधानकारक म्हटले आहे. कोर्टाने म्हटले आहे की, मुंबईतील आर्थर रोड कारागृहातील बॅरेक 12 मध्ये ठेवावे. त्याला अन्न, शुद्ध पाणी, स्वच्छ शौचालय, पलंगाची सुविधा देण्यात यावी. मुंबई सेंट्रल जेलचे डॉक्टरही नीरवसाठी उपलब्ध असावेत.
न्यायालयाने कलम 3 अंतर्गत भारतात जीवाला धोका असल्याची याचिकाही फेटाळली. नीरव मोदीची आत्महत्या करण्याच्या प्रवृत्तीबद्दल दिलेला अहवाल आम्ही पाहिला असल्याचंही कोर्टानं सांगितलं.
प्रत्यार्पण वॉरंटवरून 19 मार्च 2019 रोजी नीरव मोदीला अटक करण्यात आली होती. प्रत्यार्पण प्रकरणात अनेक सुनावणी दरम्यान वँड्सवर्थ कारागृहातून व्हिडिओ लिंकद्वारे त्यांचा सहभाग होता.जामीन घेण्याचे त्यांचे अनेक प्रयत्न दंडाधिकारी न्यायालय आणि उच्च न्यायालयात फेटाळले आहेत. कारण, फरार होण्याचा धोका आहे. सीबीआय आणि भारतात अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेल्या खटल्यांनुसार त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी लागेल. याशिवाय त्यांच्यावर इतर काही गुन्हे भारतातही दाखल आहेत.