हरिद्वार : एकीकडे देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं थैमान सुरु असताना हरिद्वारमध्ये मात्र कुंभमेळ्याचं बेधडक आयोजन सुरु होतं. या बेजबाबदारपणाचे परिणाम गेल्या चार पाच दिवसांपासून उत्तराखंडमधल्या कोरोना आकडेवारीतही दिसत होतेच. पण या सगळ्यातून धडा घेत दोन आखाड्यांनी वेळेआधीच कुंभसमाप्तीची घोषणा केली आहे. पाहुयात त्याच संदर्भातला रिपोर्ट. 


कोरोनाच्या वाढत्या उद्रेकात कुंभमेळ्यातल्या लाखो लोकांच्या गर्दींनी सर्वांची झोप उडवली होती. पण अखेर याच कुंभमेळ्यातल्या दोन आखाड्यांनी परिस्थितीचं भान राखत महत्वाचा निर्णय घेतलाय. निरंजनी आखाडा आणि आनंद आखाडा या दोन आखाडयांनी 17 एप्रिल रोजीच कुंभ समाप्तीचा निर्णय घेतला आहे.


हरिद्वारमध्ये होणारा कुंभमेळा हा 30 एप्रिलपर्यंत चालणार आहे. 30 एप्रिलला तिसरं शाहीस्नान होणार आहे. पण कोरोनाचा आकडा वाढत चालल्यानं या दोन आखाड्यांनी त्याआधीच कुंभसमाप्तीची घोषणा केलीय. अर्थातच या आखाड्यांचा हा निर्णय त्यांच्या पुरता मर्यादित आहे. कारण 13 आखाड्यांची एकत्रित संस्था असलेली आखाडा परिषद याबाबत अंतिम निर्णय काय घेतं हे महत्वाचं असेल. पण या दोन आखाड्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे इतरही पाच सहा आखाडे कुंभसमाप्तीची घोषणा करतील अशी शक्यता वर्तवली जातेय.


कुंभमेळ्यात कसा वाढला होता कोरोनाचा उद्रेक?



  • 12 आणि 14 एप्रिलला कुंभमेळ्यातलं दुसरं शाहीस्नान पार पडलं

  • या स्नानाला जवळपास 50 लाख भाविकांनी हरिद्वारमध्ये हजेरी लावल्याचं प्रशासकीय आकडे सांगतायत.

  • या चार पाच दिवसांतच एकट्या हरिद्वारमध्ये कोरोना बाधितांची संख्या 2167 वर पोहचली. 

  • शिवाय वेगवेगळ्या आखड्यांचे 19 प्रमुख संत कोरोनामुळे बाधित होते.

  • अनेक राज्यांमध्ये कुंभमेळ्याहून आलेल्या लोकांची कसून तपासणी करण्याचे आदेश दिले गेलेत.


निरंजनी आखाड्याचे महंत नरेंद्रगिरी महाराज हे शाहीस्नाना आधीच कोरोना पॉझिटिव्ह होते, त्यांच्यावर हृषिकेशच्या एम्समध्ये उपचार सुरु आहेत तर दुसरीकडे काल निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचं कोरोनामुळे निधन झालं. त्याच पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यातल्या दोन आखाड्यांनी समजूतदारपणा दाखवलाय. गंगास्नानामुळे मोक्षप्राप्ती किती होते माहिती नाही. पण किमान ज्ञानप्राप्ती झाल्याचं तरी या आखाड्यांनी दाखवून दिलं आहे.