नवी दिल्ली : देशात यंदा मान्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने (IMD) पहिला मान्सून अंदाज जाहीर केला आहे. यावर्षी पाऊस 96 टक्क्यांपासून 104 टक्क्यांपर्यंत राहणार असल्याचे सांगण्यात आलंय. हवामान खात्याने जून ते सप्टेंबर या कालावधीत दीर्घकालीन पावसाचा अंदाज जाहीर केलाय. महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक असल्याचे आयएमडीने सांगितले आहे.


पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव राजीवन म्हणाले की, “नैऋत्य मॉन्सूनमध्ये दीर्घकालीन सरासरीनुसार 98 टक्के पाऊस पडण्याची शक्यता असून यावेळी मान्सून सामान्य राहील. ही देशासाठी चांगली बातमी असून कृषी क्षेत्रासाठी ही आनंदाची बातमी आहे.


महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस 
यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्रात मागच्या वर्षीही चांगला पाऊस पडला होता. यंदाही त्याहून चांगली परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. सोबतचं दुष्काळी भागांनाही याचा चांगला फायदा होणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.




ओडिशा, झारखंड, पूर्व यूपीत कमी पाऊसओडिशा, झारखंड, पूर्व उत्तर प्रदेश आणि आसाममध्ये सामान्यपेक्षा कमी तर देशातील उर्वरीत भागात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यंदा देशात मान्सूनच्या चार महिन्यांच्या कालावधीत सरासरीच्या 98 टक्के पर्जन्यमानाचा अंदाज आहे. गेल्या दोन वर्षांपासून देशात सामान्यपेक्षा जास्त पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. ला निना आणि एल निनोचा भारतीय मान्सूनच्या वाटचालीवर मोठा परिणाम होत असतो. यंदा एल निनोच्या प्रभावाची शक्यता कमी असल्याचे राजीवन म्हणाले. देशाच्या अर्थव्यवस्थेतील महत्वाचा घटक असलेल्या कृषी क्षेत्राच्या दृष्टीने मान्सूनची वाटचाल अत्यंत महत्वाची असते. त्यामुळे मान्सूनचा अर्थव्यवस्थेवरही परिणाम दिसून येतो.