मुंबई: भाजपने गेल्या आठवड्यात 195 लोकसभा उमेदवारांची पहिली उमेदवार यादी जाहीर केली होती. यामध्ये प्रामुख्याने उत्तर भारतातील अनेक महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघांचा समावेश होता. मध्य प्रदेशात भाजपने कट्टर हिंदुत्त्ववादी नेत्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (Pragya Singh Thakur) यांचे तिकीट कापले होते. त्यांच्याऐवजी भोपाळमधून (Bhopal Loksabha) आलोक शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली होती. केंद्रातील मोदी सरकार हिंदुत्त्वाचा अजेंडा ताकदीने रेटत असताना साध्वी प्रज्ञा यांना उमेदवारी नाकारली जाणे, हा अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का ठरला होता. यानंतर साध्वी प्रज्ञा यांनी जाहीरपणे नाराजीही बोलून दाखवली होती. त्याच साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. साध्वी प्रज्ञा या 2008 सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील (Malegaon Blast) आरोपी आहेत. या प्रकरणात आता न्यायालयाने पुन्हा एकदा त्यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे.


मुंबईतील राष्ट्रीय तपासयंत्रणेच्या विशेष न्यायालयाने (NIA) साध्वी प्रज्ञासिंह यांच्याविरोधात वॉरंट जाहीर केले आहे. साध्वी प्रज्ञा या मालेगावर बॉम्बस्फोट खटल्याच्या सुनावणीला न्यायालयात गैरहजर होत्या. त्यामुळे NIA न्यायालयाने साध्वी प्रज्ञा यांना वॉरंट बजावले आहे. 10 हजार रुपयांच्या या जामीनपात्र वॉरंटची येत्या 20 मार्चपर्यंत अंमलबजावणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. साध्वी प्रज्ञा या अंतिम जबाब नोंदणी प्रक्रियेला गैरहजर राहत आहेत. त्यामुळे या खटल्याचा निकाल लागण्यास विलंब होत असल्याची तक्रार इतर आरोपींनी केली आहे. त्याची दखल घेत विशेष न्यायालायने साध्वी प्रज्ञा यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे.


हेमंत करकरेंना मी देशभक्त मानत नाही; साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचं वादग्रस्त वक्तव्य


लोकसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर साध्वी प्रज्ञा काय म्हणाल्या होत्या?


भाजपने भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली नसली तरी मनातील खंत बोलून दाखवली होती. त्यांनी म्हटले होते की, हा पक्षसंघटनेचा निर्णय आहे. पक्षाने उमेदवारी का दिली नाही आणि कशामुळे देण्यात आली नाही? याचा विचार करायचा नाही. मी 2019 मध्येही उमेदवारी मागितली नव्हती आणि आतादेखील मागितलेली नाही, असे साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही उल्लेख केला होता. महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे हा देशभक्त आहे, असं विधान ठाकूर यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी जाहीरपणे नापसंती व्यक्त केली होती. या प्रसंगाविषयी बोलताना साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले होते की, मी ज्या शब्दांच वापर केला ते शब्द पीएम मोदींना आवडले नसतील, असे असू शकते. ते म्हणाले होते मला माफ करणार नाही. मात्र, मी त्यांची माफी मागितली होती. माझं खरं बोलणं विरोधकांना आणि काँग्रेसला आवडतं नाही. मी काही बोलले की, त्याच्या फायदा ते मोदींविरोधात बोलण्यासाठी करतात, अशी भावना साध्वी प्रज्ञा यांनी बोलून दाखवली होती.


आणखी वाचा


माझे शब्द मोदींना आवडले नव्हते, मी माफीही मागितली पण... लोकसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर साध्वी प्रज्ञांनी स्पष्टच सांगितलं