नवी दिल्ली: देशातील लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha Election Date ) या 18 मार्च किंवा त्यानंतर जाहीर होण्याची शक्यता असून येत्या 15 मार्च रोजी निवडणूक आयोगाची (Election Commission Of India) महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे. 15 मार्च रोजी होणाऱ्या बैठकीमध्ये केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या रिक्त जागा भरण्यात येतील आणि त्यानंतर सोमवारी, 18 मार्च रोजी आचारसंहिता लागू करण्यात येईल अशी सूत्रांनी माहिती दिली. 


केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या दोन रिक्त जागा भरणार


निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे यांनी घेतलेली निवृत्ती आणि निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशाच्या निवडणूक आयुक्तांच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. या दोन निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती संदर्भात 15 मार्चला बैठक पार पडणार आहे. 


केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक आयोगाच्या नियुक्ती संदर्भात समिती स्थापन करण्यात येणार आहे. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी पाच नावांचे दोन स्वतंत्र पॅनेल तयार करणार आहे. या समितीमध्ये गृह सचिव आणि कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे (DOPT) सचिव यांचा समावेश असेल. 


केंद्रीय मंत्री आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते अधीर रंजन चौधरी यांच्यासह पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती, निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्तीसाठी दोन व्यक्तींची नावे देईल. त्यानंतर राष्ट्रपती निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करतील.


18 मार्च नंतर निवडणुका जाहीर होण्याची शक्यता


केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक ही शुक्रवारी 15 मार्च रोजी होणार आहे. त्यानंतर शनिवार आणि रविवारी सुट्टी असून सोमवारी किंवा त्यानंतर म्हणजे 18 मार्चनंतर आचारसंहिता लागू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 


निवडणूक आयुक्तांचा राजीनामा 


लोकसभा निवडणूक जाहीर होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक असताना केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्याने खळबळ माजली होती. केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये तीन आयुक्त असतात. त्यापैकी एक मुख्य आयुक्त आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी इतर दोन आयुक्त असतात. या आधीच एक आयुक्तपद रिक्त होतं. अरूण कुमार यांच्या राजीनाम्यानंतर दुसरे पदही रिक्त राहिलं. त्यामुळे ही दोन्ही पदं भरून घेण्यात येणार आहेत आणि त्यानंतर लोकसभेचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. 


लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा सुरूच


लोकसभेच्या निवडणुका पुढच्या आठवड्यात जाहीर होणार असून त्यासाठी राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागावाटपाच्या चर्चा सुरू  आहेत. येत्या एक दोन दिवसात त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. 


ही बातमी वाचा: