नवी दिल्ली: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (National Highways Authority of India -NHAI) महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी राजमार्गयात्रा (Rajmargyatra) नावाचे अॅप लॉंच केले आहे. हे मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर तसेच आयओएस अॅप स्टोअरवरही उपलब्ध असणार आहे. 


भारतीय महामार्गावरील इत्यंभूत माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचवणे तसेच त्यांना काही तक्रारी आल्यास, समस्या उद्भवल्यास त्याचं निराकरण करणे हे या अॅपच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. हे अॅप सध्या हिंदी आणि इंग्रजी यो दोन भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे.


राजमार्गयात्रा या अॅपची वैशिष्ट्ये (Key Features of Rajmargyatra App)


हायवे वरील सर्व माहिती उपलब्ध करून देणे - महामार्गाच्या संबंधित सर्व अद्ययावत माहिती ही प्रवाशांना या अॅपवर उपलब्ध होईल. त्यामध्ये हवामानाची स्थिती, त्यासंबंधित नोटिफिकेशन्स, जवळपासचे सर्व टोल प्लाजा, पेट्रोल पंप, रुग्णालये आणि हॉटेल तसेच सर्व इतर गरजेच्या सेवांची माहिती या अॅपच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. प्रवाशांचा प्रवास हा अधिक आरामदायी आणि सुखकर होण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. 


सोप्या पद्धतीने तक्रार निवारण - महामार्गावर प्रवास करताना प्रवाशांना येणाऱ्या अडचणी, त्यांच्या तक्रारीचे निवारण एकाच ठिकाणी सोप्या पद्धतीने या अॅपच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. महामार्गाशी संबंधित सर्व तक्रारी, जिओ टॅग केलेले व्हिडीओ किंवा त्याचे फोटो टाकून यूजर्स तक्रारी नोंदवू शकतात. या तक्रारींची दखल निर्धारित वेळेत घेतल्या जातील. तसेच यामध्ये पारदर्शकता येण्यासाठी यूजर्स त्यांच्या तक्रारीची सद्य स्थिती ट्रॅक करू शकतात. 


फास्ट टॅग सेवा - राजमार्गयात्रेच्या माध्यमातून फास्ट टॅग सर्व्हिस अधिक सोपी होण्यासाठी विविध बँकांच्या सेवांचे एकत्रिकरण करण्यात येईल. त्यामुळे यूजर्सना त्यांचे FASTag रिचार्ज करणे, मासिक पास घेणे आणि इतर FASTag-संबंधित बँकिंग सेवा एकाच ठिकाणी सहज उपलब्ध होतील. 


जबाबदार आणि सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी प्रोत्साहन देण्यासाठी ओव्हर-स्पीडिंग सूचना आणि व्हॉईस असिस्टंट सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. या सुधारणांसह, 'राजमार्गयात्रा'चा उद्देश महामार्ग यूजर्ससाठी यूजर फ्रेंडली अनुभव देणे, भारतीय राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षित आणि अधिक आनंददायी प्रवासाला चालना देणे हे आहे.


 






ही बातमी वाचा: