Fastag Toll Collection: भारतात फास्टॅग मार्फत टोल वसुली सुरू करण्यात आल्यानंतर टोल नाक्यावरील वाहतूक कोंडीपासूनचा वेळ वाचू लागला आहे. त्याशिवाय, जलदपणे टोल वसुली होत आहे. फास्टॅगद्वारे करण्यात आलेल्या टोल वसुलीने विक्रमी महसूल मिळवला आहे. शनिवार, 29 एप्रिल रोजी एकाच दिवसात फास्टॅगद्वारे 193.15 चा टोल वसूल करण्यात आला. 


राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, सरकारने फेब्रुवारी 2021 मध्ये फास्टॅग अनिवार्य केल्यापासून, फास्टॅग कार्यक्रमांतर्गत टोल प्लाझांची संख्या 770 वरून 1,228 पर्यंत वाढली आहे, ज्यात 339 राज्य टोल प्लाझांचा समावेश आहे. वापरकर्त्यांना सुमारे 97 टक्के प्रवेश दर आणि 6.9 कोटी पेक्षा जास्त फास्टॅग जारी केले आहेत. 


महामार्गाचा वापर करणाऱ्या वाहन चालकांकडून फास्टॅगचा सातत्यपूर्ण आणि प्रगतीशील अवलंब केल्याने केवळ टोल कार्यान्वयनाची कार्यक्षमता वाढली आहे. टोल वसूल करण्याशिवाय, फास्टॅगने संपूर्ण भारतातील 50 हून अधिक शहरांमध्ये 140 पेक्षा जास्त वाहनतळांवर पार्किंग शुल्कासाठी फास्टॅगचा वापर सुरू केला आहे. 


पेमेंट डिजिटल पद्धतीने टोल वसुली 


पेमेंट डिजिटल पद्धतीने टोल वसुली होत असल्याने वाहन चालकांना टोल प्लाझावर फार वेळ थांबावे लागत नाही. अवघ्या काही सेकंदात टोल भरून पुढे जातात. त्यामुळे टोल प्लाझा आणि राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीचाही प्रश्नही सुटला आहे. बँकेच्या वॉलेटशी जोडलेल्या FASTag द्वारे डिजिटल पद्धतीने पेमेंट केले जाते. ही प्रक्रिया सुरू झाल्याने बहुतांश ठिकाणी स्लिपद्वारे टोलवसुली बंद झाली आहे.


NHI ने टोल वसुली प्रक्रिया सुलभ केली आहे


NHAI ने सांगितले की टोल संकलनात प्रभावी वापर केल्यानंतर, FASTag ने देशातील 50 हून अधिक शहरांमध्ये 140 हून अधिक पार्किंग लॉटमध्ये पैसे भरण्याची सुविधा दिली आहे. NHAI ने असेही म्हटले आहे की देशातील अधिक सुरळीत टोल प्रणालीसाठी ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट उपग्रह स्थापित करण्याची योजना आहे. या योजनेनंतर टोल प्लाझा बंद होणार असून आपल्या वाहनाने किती अंतर कापले यावरून टोल वसूल करण्यात येणार आहे. 


सॅटेलाइट नेव्हिगेशन टोलिंग सिस्टिम ही नवी यंत्रणा लागू करण्यासाठी केंद्र सरकारनं चाचण्या सुरु केल्या आहेत. त्यात देशभरातील 1 लाखांहून अधिक वाहनांचा समावेश आहे.  


जीपीएस आधारीत टोल वसुली म्हणजे काय?


सध्या बहुतांशी नव्या वाहनांमध्ये जीपीएस यंत्रणा असते. संबंधित वाहनाने प्रवास केलेल्या मार्गावरून टोल वसूल केला जाणार. टोलची रक्कम ही वाहनधारकाच्या बँक खात्यातून अथवा ई-वॉलेटमधून कापण्यात येईल. ज्या वाहनांमध्ये जीपीएस यंत्रणा नसणार, अशा वाहनांसाठी जीपीएस लावण्यासाठी सरकार निर्णय घेणार असल्याचे याआधी परिवहन, रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले होते.