नवी दिल्ली : अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेध नोंदवला आहे. जम्मू काश्मिरात शांततेने प्रवास करणाऱ्या अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या भ्याड हल्ल्याने क्लेश झाल्याच्या भावना मोदींनी व्यक्त केल्या.


'या हल्ल्याचा प्रत्येकाकडून तीव्र निषेध व्हायला हवा. भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे झालेला त्रास शब्दांमध्ये व्यक्त करण्यापलिकडचा आहे. या हल्ल्यात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं, त्यांचं माझ्याकडून सांत्वन आणि जखमी नागरिकांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना.' असं मोदींनी ट्विटरवर म्हटलं आहे.

'अशा भ्याड हल्ल्यांपुढे भारत कधीच झुकणार नाही. जम्मू-काश्मिरचे गव्हर्नर आणि मुख्यमंत्री यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. लागेल ती मदत करण्याची आमची तयारी आहे, असंही मोदी म्हणाले.

https://twitter.com/narendramodi/status/884459474810843137

https://twitter.com/narendramodi/status/884459474810843137

https://twitter.com/narendramodi/status/884459474810843137

https://twitter.com/narendramodi/status/884459929582436352

जम्मू काश्मिरमधील अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेतील बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये सात भाविकांना आपले प्राण गमवावे लागले, तर 32 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा महिलांचा समावेश आहे.

मृत भाविक गुजरातचे

सोमवारी रात्री 8 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास यात्रेकरुंच्या बसवर गोळीबार केला. संबंधित बस ओम ट्रॅव्हल्सची ( GJ 09 Z 9976) असून मृत भाविक हे गुजरातच्या वलसाडमधील होते. हल्ल्यात ट्रॅव्हल्स मालकाचा मुलगाही जखमी झाला.

बसची नोंदणी नाही

अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या बसेसचं रजिस्ट्रेशन केलं जातं. अशा बसेसना सुरक्षा पुरवण्यात येते. मात्र हल्ला झालेल्या बसची नोंदणी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. खरं तर ही बस सुरक्षा दलासोबत येत होती, मात्र वाटेत थांबल्यामुळे ती जत्थ्यापासून दुरावली, असं म्हटलं जात आहे.

पोलिसांवरही हल्ला

बांतिगू परिसरात पोलिसांच्या पथकावरही दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. यात तीन पोलिस जखमी झाल्याची माहिती आहे.

हायअलर्ट जारी

घटनेच्या पार्श्वभूमीवर जम्मू-श्रीनगर महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. जम्मू, उधमपूर, कठुआ, सांबा, रामबनमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

यात्रा सुुरु राहणार

अमरनाथ यात्रांमध्ये खंड पाडण्यासाठी हा हल्ला करण्यात आला. त्यामुळे या हल्ल्यानंतरही अमरनाथ यात्रा सुरु राहणार असल्याचं जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी स्पष्ट केलं आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू आणि काश्मीरमधील इंटरनेट सेवा तात्पुरती खंडित करण्यात आली आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू काश्मिरच्या मुख्यमंत्री आणि राज्यपालांशी चर्चा केली आहे.

निष्पाप नागरिकांवरील हल्ला अत्यंत निंदनीय असल्याचं संरक्षणमंत्री अरुण जेटली म्हणाले. दहशतवाद समूळ नष्ट करण्याचा आमचा निर्धार अधिक दृढ झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

पीएमओची आपत्कालीन बैठक

पंतप्रधान कार्यालयात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल यांच्यासोबत तातडीने बैठक घेण्यात आली. हल्ल्याची संपूर्ण माहिती घेतली जात असून काही काळासाठी यात्रा स्थगित केल्या जाण्याची शक्यता आहे.

जम्मू- काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रा सुरु असून या यात्रेसाठी देशभरातील भाविक मोठ्या प्रमाणात राज्यात दाखल होतात. या यात्रेच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय राखीव दल अर्थात सीआरपीएफकडे असते. या वर्षी दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर लष्कराकडे यात्रेची जबाबदारी सोपवण्यात आली होती.



कुठे चूक झाली?

अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकारकडून कडेकोट सुरक्षा पाळली जाते. यात्रेच्या संपूर्ण मार्गावर कानाकोपऱ्यात सुरक्षा अधिकारी तैनात असतात. अमरनाथ यात्रेच्या नियमानुसार रात्री सात वाजल्यानंतर या मार्गावरुन कोणतीही बस जात नाही. त्यामुळे रात्री 8.20 हल्ला झालेली बस रस्त्यावर असणं हे हलगर्जीचं लक्षण मानलं जात आहे.

2000 साली अमरनाथ यात्रेवर हल्ला

अमरनाथ यात्रेकरुंवर झालेला हा पहिलाच दहशतवादी हल्ला नाही. 1 ऑगस्ट 2000 रोजी दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेकरुंवर हल्ला केला होता. त्यावेळी पहलगाममध्ये 30 भाविकांना प्राण गमवावे लागले होते. 2000 साली पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार सत्तेत होतं.

अमरनाथ यात्रा म्हणजे काय?

जम्मू काश्मिरच्या अनंतनागमध्ये दरवर्षी बर्फापासून शिवलिंग तयार होतं. या शिवलिंगाच्या दर्शनासाठी
हजारो भाविक दरवर्षी रजिस्ट्रेशन करतात. यावर्षी 2 लाख 30 हजार यात्रेकरुंनी नोंदणी केली होती. यंदा 29 जून रोजी सुरु झालेली अमरनाथ यात्रा 40 दिवस चालू राहील. रक्षाबंधनला अमरनाथ यात्रा पूर्ण होईल.

अमरनाथ यात्रेला जम्मू काश्मीरमध्ये दोन मार्गांनी भाविक जातात. जम्मूच्या बालाटाल मार्गे अमरनाथ
गुंफेपर्यंत जाता येतं. तसंच जम्मूहून पहलगाम मार्गे अमरनाथ गुंफेपर्यंत जाता येतं.

संबंधित बातमी :

अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला, 7 भाविकांचा मृत्यू