पाटणा: बिहारमधील राजकारण सध्या एका वेगळ्याच वळणावर येऊन उभं ठाकलं आहे. त्यामुळे पुढच्या क्षणी काय होईल याचा अंदाज कुणालाच लावता येत नाही. याच दरम्यान, बिहार भाजपचे अध्यक्ष नित्यानंद राय यांनी राजकीय खळबळ उडवून देणारं वक्तव्य केलं आहे. 'भाजप नितीश कुमार यांना बाहेरुन पाठिंबा देऊ शकतं.' असं नित्यानंद राय म्हणाले.


याचाच अर्थ नितीश कुमार यांनी यापुढे लालूप्रसाद यांच्या पाठिंब्याचा विचार करु नये असं भाजपला वाटतं. नीतीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांना बरखास्त करावं. त्यामुळे सरकार जर अडचणीत आलं तर भाजप नितीश कुमार यांना पाठिंबा देईल.

नित्यानंद राय म्हणाले की, 'जर एखाद्या व्यक्तीनं अघोषित संपत्ती जमा केली असेल तर अशा व्यक्तीला मंत्रिमंडळात ठेवलं जाऊ नये. जर तुम्हाला पाठिंब्याची गरज पडली तर आम्ही बाहेरुन पाठिंबा देऊ. पण आम्ही सरकारमध्ये सहभागी होणार नाही.'

लालू आणि त्यांच्या नातेवाईकांवर सीबीआयनं एफआयआर दाखल केल्यानंतर राष्ट्रीय जनता दल अर्थात आरजेडीचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे धाकटे चिरंजीव आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे कोणत्याही परिस्थितीत आपल्या पदाचा राजीनामा देणार नसल्याचे पक्षानं स्पष्ट केलं आहे.

सीबीआयनं लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्यासह सात लोकांवर रेल्वेच्या हॉटेलचे कंत्राट देताना भ्रष्टाचारप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे.

कसं आहे बिहारचं सत्ता समीकरण:

बिहारमध्ये विधानसभेच्या 243 जागा आहेत. त्यामुळे इथं मॅजिक फिगर 122 आहे. बिहारमध्ये जेडीयू, आरजेडी आणि काँग्रेसची आघाडी आहे. या आघाडीत जेडीयू 71, आरजेडी 80 आणि काँग्रेसकडे 27 जागा आहे. म्हणजे एकूण 178  जागा आहेत. तर भाजपच्या 53 जागा आहेत.

अशावेळी जर आरजेडीनं पाठिंबा काढून घेतला तर जेडीयूच्या 71 जागा, भाजपच्या 53 आरएलएसपी आणि एलजेपी 2-2 आणि हम या पक्षाची 1 जागा (एकूण 129 जागा) मिळून नितीश कुमार सत्ता स्थापन करु शकतात.