New Delhi : भारत-चीन (India-China War) सीमेवरील संघर्षात चार वर्षांनंतरही कोणताही बदल झालेला नाही. सीमेवरील परिस्थिती दिवसेंदिवस संवेदनशील होत चालली आहे. भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे (General Manoj Pandey) यांनी शुक्रवारी सांगितले की, वास्तविक नियंत्रण रेषेवरील (LAC) परिस्थिती 'स्थिर पण संवेदनशील' आहे. ते म्हणाले की चीनच्या सीमेवर भारतीय सैन्य आणि इतर घटकांची तैनाती 'अत्यंत मजबूत' आणि 'संतुलित' आहे.


एका 'कॉन्क्लेव्ह'मध्ये झालेल्या चर्चेदरम्यान ते म्हणाले, "पायाभूत सुविधा आणि सैन्याच्या हालचालींच्या बाबतीत सीमेवर काय घडामोडी घडतायत यावर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे." सीमेवर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत असंही जनरल मनोज पांडे म्हणाले. 


"परिस्थिती स्थिर, परंतु संवेदनशील"- जनरल मनोज पांडे 


पँगॉन्ग लेक परिसरात झालेल्या हिंसक चकमकीनंतर 5 मे 2020 रोजी पूर्व लडाख सीमेवर कोंडी झाली होती. जून 2020 मध्ये गलवान व्हॅली चकमकीनंतर दोन्ही देशांमधील संबंध लक्षणीयरीत्या बिघडले होते. दोन्ही बाजूंमधील अनेक दशकांतील हा सर्वात गंभीर लष्करी संघर्ष होता. एलएसीवरील सद्यस्थितीबाबत जनरल पांडे म्हणाले, "आत्ताची परिस्थिती स्थिर, परंतु संवेदनशील आहे." ते म्हणाले की, LAC आणि इतर घटकांवर सैन्याच्या सध्याच्या तैनातीच्या संदर्भात मी थेट म्हणेन की आमची तैनाती अत्यंत मजबूत आणि संतुलित आहे. संपूर्ण LAC वर उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही संभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आम्ही लष्करी पायाभूत सुविधा आणि तोफखाना यांचा पुरेसा साठा असेल याची खबरदारी घेतली आहे."


LAC च्या परिस्थितीवर लष्करप्रमुख काय म्हणाले?


'इंडिया अँड द इंडो-पॅसिफिक: थ्रेट्स अँड चॅलेंजेस' या विषयावरील कार्यक्रमाला संबोधित करताना जनरल मनोज पांडे म्हणाले की, LAC वर बारकाईने लक्ष ठेवताना, पायाभूत सुविधा आणि सैन्याच्या हालचालींच्या बाबतीत इतर काय घडामोडी घडतात हे देखील पाहणं गरजेचं आहे. या प्रदेशात चीनचा वाढता प्रभाव आणि भविष्यातील तयारी यामुळे एलएसीवरील वाढता तणाव या प्रश्नाला उत्तर देताना लष्करप्रमुख बोलत होते.


महत्त्वाच्या बातम्या :


लोकसभेचं बिगुल आज वाजणार, निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार; निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडं देशाचं लक्ष