Negative RT-PCR Test : भारतात येणाऱ्या प्रत्येक आंतरराष्ट्रीय प्रवाशाला निगेटिव्ह आरटीपीसीआर (Negative RT-PCR Test ) चाचणी दाखवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं याबाबतचा निर्णय घेतला आहे.  कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 23 मार्च 2020 पासून आतंरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध लावण्यात आले होते. पण मे 2020 नंतर वंदे भारत मिशन अंतर्गत आंतरराष्ट्रीय विमानप्रवास सुरु आहे. 


गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचं दिसत आहे. दररोजच्या नव्या रुग्णसंख्येमध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे. त्यामुळे उपचाराधीन रुग्णसंख्याही कमी होत आहे. यासोबतच देशातील लसीकरणही वेगात सुरु आहे. डिसेंबरअखेरपर्यंत भारतातील 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण पूर्ण करण्याचं ध्येय भारतानं ठेवलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर देशांतर्गत विमानप्रवासावरील निर्बंध उठवण्यात आले. त्यामुळे 18 ऑक्टोबरपासून 100 टक्के क्षमतेनं विमानप्रवास सुरु झालाय. याआधी ८५ टक्केंच्या क्षमतेनं देशाअंतर्गत विमानप्रवास सुरु होता.  






लसीकरणाच्या 100 कोटी डोसपासून एक पाऊल दूर!
आतापर्यंत देशात कोरोना प्रतिबंधक लसीचे 99 कोटीहून अधिक डोस देण्यात आले असून आज ऐतिहासिक 100 कोटींचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. 100 कोटी लसींचा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने जय्यत तयारी सुद्धा केली आहे.  16 जानेवारी रोजी देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर 1 फेब्रुवारीला एक कोटी डोस देण्यात आले. 15 जून रोजी 25 कोटी डोस पूर्ण झाले तर 6 ऑगस्ट रोजी 50 कोटी डोस पूर्ण झाले. त्यानंतर 13 सप्टेंबरला 75 कोटी लसींचा टप्पा पूर्ण झाला तर मंगळवारी, 19 ऑक्टोबरला 99 कोटीहून अधिक लोकांना डोस देण्यात आले आहेत. 


24 तासांत 14 हजार 623 नव्या रुग्णांची नोंद 
देशात गेल्या 24 तासात 14 हजार 623 नव्या रुग्ण आढळून आले आहेत. तर, 197 मृत्युंची नोंद झाली आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांची संख्या 4 लाख 9 हजार 651 वर पोहचली आहे. देशात सध्या 1 लाख 78 हजार कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. तर, गेल्या 24 तासात 19 हजार 446 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत एकूण 3 कोटी 34 लाख 78 हजार 247 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत 3 कोटी 41 लाख 996 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.