NEET-UG Paper Leak Case : NEET-UG पेपर लीक प्रकरणात सीबीआयने झारखंडमधील हजारीबागच्या ओएसीस महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि उपप्राचार्य यांच्यासह आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे. डॉ. एहसान-उल-हक आणि इम्तियाज आलम अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. एहसान-उल-हक हा नीट परीक्षेचा को-ऑर्डिनेटर होता. या प्रकरणात स्थानिक वृत्तपत्राच्या एका पत्रकाराचीही चौकशी सुरू असून त्यालाही अटक करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 


गेल्या महिन्यात म्हणजे 5 मे रोजी नीटसाठी वेगवेगळ्या शहरात प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर परीक्षेमध्ये घोळ झाल्याचं निदर्शनास आलं  होतं. त्यानंतर 26 जून रोजी  सीबीआयने हजारीबाग येथील ओएसिस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एहसान उल हक यांची चौकशी केली होती. 


शुक्रवारी सायंकाळी उशिरा 12 अधिकाऱ्यांचे पथक हजारीबाग येथे पोहोचले आणि त्यांनी प्राचार्य आणि उपप्राचार्याला अटक केली. गेल्या आठवडाभरापासून हजारीबागमधील NEET प्रश्नपत्रिका लीक प्रकरणाचा तपास CBI करत आहे. 


बिहारमध्ये फुटलेला पेपर ओएसिस महाविद्यालयाशी संबंधित 


NEET पेपर लीक प्रकरणाच्या तपासादरम्यान बिहार पोलिसांनी अटक केलेल्या उमेदवारांच्या घरातून अर्धे जळालेले पेपर सापडले होते. यामध्ये प्रश्नपत्रिकेच्या फोटोकॉपीही होत्या. बिहारच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOU) या जळालेल्या प्रश्नपत्रिका NTA ने पुरवलेल्या मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळल्या. त्यामध्ये अर्ध्या जळालेल्या प्रश्नपत्रिकांमधील 68 प्रश्न मूळ प्रश्नपत्रिकेशी एकरूप असल्याचे आढळले. अधिक तपासात पोलिसांना सापडलेल्या प्रश्नपत्रिका हजारीबाग येथील ओएसिस स्कूलच्या पुस्तिकेशी जुळत असल्याचे समोर आले. 


बिहार पोलिसांना मिळालेल्या पुराव्यानंतर सीबीआयने ओएसिस स्कूलच्या प्राचार्य आणि उपप्राचार्याची चौकशी सुरू केली आणि आता त्यांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यातआलेल्या ओएसिस स्कूलचे प्राचार्य एहसान उल हक हे सीबीएसईचे शहर समन्वयक आहेत. हजारीबाग, चतरा, कोडरमा आणि रामगढ या चार जिल्ह्यांमध्ये त्यांची केंद्रे आहेत, जिथे CBSE अनेक परीक्षा घेते.


ही बातमी वाचा: