NEET Exams Controvery in Supeme Court: नवी दिल्ली : NEET परीक्षेतील (NEET Exam) हेराफेरीच्या आरोपांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल करण्यात आलेल्या तीन याचिकांवर आज सुनावणी पार पडली. NEET परीक्षा आयोजित करणारी संस्था NTA कडून विद्यार्थ्यांना परीक्षेत दिलेल्या वाढीव गुणांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद झाला. परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्याबाबत याचिका सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून याचप्रकरणी सुनावणी पार पडली. विद्यार्थ्यांनी घाबरण्याची गरज नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी दरम्यान स्पष्ट केलं. 


याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की, समुपदेशन सुरूच राहणार असून आम्ही ते थांबवत नाही. जेव्हा परीक्षा असते, तेव्हा सर्वकाही पूर्णतेनं केलं जातं. अशा परिस्थितीत, परीक्षा पूर्णपणे रद्द करणं योग्य नाही, अशी टिप्पणीही सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीवेळी केली आहे. त्याचवेळी केंद्र सरकारच्या वकिलांनी सांगितले की, शिक्षण मंत्रालयाने स्थापन केलेल्या चार सदस्यीय समितीनं 1500 हून अधिक मुलांची फेरपरीक्षा घेण्याचं सुचवलं आहे. हे लोक पुन्हा परीक्षेला बसले नाहीत, तर ग्रेस नंबर काढून टाकण्याचा विचार केला जाऊ शकतो. 


नीट यूजी 2024  मध्ये ग्रेस मार्क मिळालेल्या 1563 मुलांचे निकाल रद्द करणार असल्याची माहिती केंद्र सरकारनं नीट घोळाबाबतच्या सुनावणी दरम्यान दिली आहे. निकाल रद्द झालेल्यांना पुन्हा परीक्षा देण्याची मुभाही सरकारच्या वतीनं देण्यात आली आहे. तसेच, पात्र विद्यार्थ्यांचं काऊन्सिलिंग, प्रवेश प्रक्रिया सुरूच राहणार असल्याचंही केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे. 


ग्रेस मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांचे निकाल रद्द


सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीदरम्यान म्हटलं की, तुमची मागणी एनटीएनं मान्य केली आहे. ते ग्रेस मार्क काढून टाकत आहेत. ग्रेस मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांचे निकाल रद्द करण्यात येणार आहेत. तसेच, निकाल रद्द झालेल्यांना पुन्हा परीक्षा देण्याची मुभाही सरकारच्या वतीनं देण्यात आली आहे. या परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्किंग मिळाले आहेत, तेच पात्र असतील. तसेच, NTA नं सांगितलं की, 23 जून रोजी पुन्हा परीक्षा (1563) होईल, त्यानंतर समुपदेशन होईल. तिसऱ्या याचिकेतील पेपर लीकचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयासमोर नाही. तसेच, निकाल 30 जूनपूर्वी येऊ शकतो.


NEET परीक्षेच्या निकालाबाबत सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ग्रेस मार्क्स, पुनर्परीक्षा आणि परीक्षा रद्द करण्याबाबतच्या याचिकांवर आज (13 जून) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. दिल्ली हायकोर्टात काल (12 जून) NEET परीक्षेबाबतही सुनावणी झाली.