कानपूर : सातत्याने चर्चेत राहणाऱ्या कानपूरच्या महापौर (Mayor) प्रमिला पांडेय यांचा एका व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. महापालिकेतील एका नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यावर त्यांनी थेट फाईल फेकून दिल्याचं या व्हिडिओतून दिसून येतं. हा अधिकारी काय मला बुद्धू समजतो का, चल हट इथून.. असे म्हणत महापौर पांडेय यांनी महापालिकेतील (Munciple corporation) अधिकाऱ्याला चांगलेच फैलावर घेतले होते. सध्या, सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पांडेय यांच्यावर टीका होत आहे. 


कानपूर महापालिकेच्या कार्यालयातील ही घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. महापौर प्रमिला पांडेय यांनी नाले साफ सफाईसह इतर विषयांवर महत्त्वाची बैठक बोलावली होती. यावेळी, संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा करताना, नाले सफाईच्या बेजबाबदारपणाच्या कामावरुन नाराजी दर्शवली. यावेळी, झोन 3 चे अधिकारी अभियंता नानक चंद यांनी मार्च महिन्यातील अहवाल दाखवला. त्यावेळी, महापौर पांडेय यांनी रागाने ती फाईलच फेकून दिली. आता, जर गटार भरली तर त्यातच बूडवेन असे म्हणत संतापही व्यक्त केला. अधिकारी नानक चंद यांनी मार्च महिन्यातील फाईल जून महिन्यात दाखवल्यामुळे महापौर पांडेय ह्या संतापल्या होत्या. त्यातूनच त्यांनी अधिकाऱ्याला चांगलंच फैलावर घेतलं. यावेळी, त्यांच्या हातातील फाईलही भिरकावली. तसेच, हा काय मला बुद्धू समजतो का, असा सवालही उपस्थितांना विचारला. 


याप्रकरणी प्रमिला पांडेय यांनीही आपली बाजू मांडली आहे, ज्याप्रमाणे नालेसफाईचं 90 टक्के काम झालंय, असे अधिकारी सांगत होते. पण, तेवढं काम झाल्याचं मला तरी दिसून येत नाही. आरोग्य विभाग हा अभियंता विभागाकडे जबाबदारी ढकलतोय, तर अभियंता विभाग आरोग्य विभागावर जबाबदारी ढकलतोय. त्यामुळे, मी दोन्ही विभागाची एकत्रित बैठक बोलावली होती. विशेष म्हणजे पावसाळ्यापूर्वी दोन महिने अगोदर मी महौपार या नात्याने नाले-सफाईचे आदेश दिले होते. मात्र, अद्याप नाले-सफाईचं काम पूर्ण झालं नाही. याउलट जोपर्यंत अतिक्रमण हटत नाही, तोपर्यंत नालेसफाई होणार नाही, असं मला सांगण्यात आल्याचं पांडेय यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. 


महापौरांचं स्पष्टीकरण


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, महापौर पांडेय यांनी सर्वच 6 विभागाच्या इंजिनिअर्सची बैठक बोलावली होती. नाले-सफाईच्या अनुषंगाने महापालिकेत ही बैठक बोलावण्यात आली होती. त्यामध्ये, एकही अधिकारी नालेसफाईच्या कामावेळी प्रत्यक्ष हजर असल्याचा फोटो दाखवू शकला नाही. त्यामुळे, महापौर यांनी संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. उन्हाळ्यात प्रत्यक्ष जागेवर जाऊन काम करायला कुणालाही नको वाटतं, सगळे एसी कार्यालयात बसून हवा घेत होते, असे पांडेय यांनी म्हटले. तसेच, यावेळी कामाचा अहवाल मागितल्यानंतर महापौरांना मार्च महिन्यातील फाईल दाखवण्यात आली. त्यावरुन संतप्त होत महापौरांनी अभियंत्याला चांगलंच सुनावलं.