नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात झालेल्या दोन्ही देशांच्या सैनिकांमधील हिंसक झडपेत भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तर चीनचेही सैनिक यामध्ये मारले गेल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र यामध्ये जीवितहानी झाल्याचे वृत्त चीनकडून सातत्याने नाकारण्यात येत होते. मात्र आता चिनी सरकारने या झटापटीत चार सैनिक मारले गेल्याचे कबूल केले असून त्यांची नावे देखील जाहीर केली आहे.


चीनच्या सीजीटीएन या सरकारी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, पीएलए आर्मीचे बटालियन कमांडर चेन होंगजुन यांना 'हिरो' उपाधी देऊन गौरविण्यात आले आहे. तर चेन जियानगाँग, जिओ सियुआन आणि वांग जुओरन या तीन जणांचा गलवानमधील झटापटीत मृत्यू झाला. चीनच्या सैन्याचे नेतृत्व करणारे कर्नल क्यू फेबाओ (रेजीमेंटल कमांडर) हे या झटापटीत गंभीर जखमी झाले होते. त्यांना 'हिरो कर्नल' या उपाधीने गौरविण्यात आले आहे.


15 जूनच्या रात्री नेमकं काय घडलं?


भारत आणि चीनमध्ये 6 जून रोजी मेजर जनरल रँक लेव्हलची चर्चा झाली होती. यामध्ये सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यावर सहमती झाली होती. 6 जूनच्या चर्चेनुसार चीनच्या सैनिकांना त्यांच्या सीमेत आणखी मागे जाण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र शांततेत चर्चा करण्याऐवजी चीनने वाद घालण्यास सुरुवात केली.


त्यानंतर भारतीय सैनिक आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक झडप झाली. घटनास्थळी भारतीय जवानांची संख्या चीनच्या सैनिकांच्या तुलनेने कमी होती. यावेळी चीनच्या सैनिकांनी भारतीय जवानांवर लाठ्याकाठ्या, दगड आणि टोकदार हत्यारांना भ्याड हल्ला चढवला. या हल्ल्यात 20 जवान जखमी झाले होते. त्यानंतर आज सकाळी भारतीय लष्कराने एका अधिकाऱ्यासह तीन जवान शहीद झाल्याची माहिती दिली होती. यामध्ये कर्नल संतोष बाबू, हवालदार पालानी आणि कुंदन झा यांचा समावेश होता.


गलवान खोऱ्यात पेट्रोलिंग पॉईंट 14 जवळ दोन्ही सैन्यात बातचित सुरु होती. चीनी सैनिकांच्या हल्यानंतर भारतीय सैनिकांनीही प्रत्युत्तर देत हल्ला चढवला. यामध्ये चीनचे 45 सैनिक मारले गेल्याचा दावा भारताने केला होता.


संबंधित बातम्या