राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावून एनडीएने एकप्रकारे सायकोलॉजिकल इफेक्ट साधला. ज्या छोट्या पक्षांचं अजून तळ्यात मळ्यात सुरु आहे, त्यांना बहुमताची ताकद कुणाच्या बाजूनं हे कळावं यासाठीच या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.
सर्वात महत्वाचं म्हणजे या बैठकीची सुरुवात झाली ती 2019 च्या उल्लेखाने. 2019 ची लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात लढवून एनडीएचं सरकार स्थापन करण्यासंदर्भातला ठराव बैठकीच्या सुरुवातीलाच मंजूर झाला.
लोकजनशक्ती पक्षाचे रामविलास पासवान यांनी हा प्रस्ताव मांडला, त्यानंतर एनडीएच्या सगळ्या घटक पक्षांनी त्याला अनुमोदन दिलं.
सुरुवातीला चंद्राबाबू नायडू, प्रकाशसिंह बादल, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि रामविलास पासवान यांनी त्यावर आपली मतं मांडली. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाची मागणी केल्याची माहिती आहे. मात्र शिवसेनेने या ठरावाला अनुमोदन देणं याचा अर्थच लोकसभेसाठी शिवसेना-भाजप एकत्र लढणार हे जवळपास निश्चित असल्याची चर्चा दिल्लीत सुरु आहे.
मुंबई महापालिकेची रणधुमाळी संपल्यानंतर आता पुढच्या दोन वर्षात कुठली निवडणूक नाही. आता थेट महत्वाची निवडणूक ही लोकसभेचीच आहे. त्यामुळे त्यासाठी भाजपशी जुळवून घ्यायची तयारी शिवसेनेने केल्याची माहिती आहे.
एनडीएच्या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबद्दल एका अक्षराचीही चर्चा झाली नाही. पण सुरुवात मात्र 2019 च्या उल्लेखाने झाली. याचाही अर्थ स्पष्ट आहे. 2019 साठी आम्ही आमचा नेता जाहीर केलाय, आमच्या विजयात तुम्हालाही सामील करु. पण त्यासाठी परतफेड करण्याची वेळ ही राष्ट्रपती निवडणुकीत आहे, असा मेसेजच या ठरावातून भाजपने सर्व घटक पक्षांना दिला आहे.
दिल्लीत काल रात्री साडेसहा वाजता सुरु झालेली ही बैठक तब्बल पाच तास चालली. या भेटीच्या निमित्ताने अमित शहा आणि उद्धव ठाकरे हे तब्बल तीन वर्षानंतर आमनेसामने आले.
बैठकीत या दोघांमध्येच वैयक्तिक 15 ते 20 मिनिटे काही खलबतंही झाली. शिवाय नंतरच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमातही उद्धव ठाकरे-नरेंद्र मोदी हे मोकळ्या वातावरणात भेटले.
महाराष्ट्रातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले, रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी हे महायुतीचे चार नेते या बैठकीला उपस्थित होते.