मुंबई: महाराष्ट्राचे सुपुत्र कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानातील आर्मी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर, भारतात पाकविरोधी आवाज उठत आहेत.


कोणत्याही पुराव्याशिवाय कुलभूषण जाधव यांना भारतीय गुप्तचर यंत्रणा अर्थात रॉचे एजंट ठरवलं आहे. तसंच जाधव यांच्यावरील खटल्याची माहिती गोपनीय ठेवल्याने भारत आक्रमक झाला आहे.

कुलभूषण यांच्यासोबत सरकार पूर्णपणे न्याय करेल, असं आश्वासन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलंय. तसंच त्यांच्या सुटकेसाठी काहीही करण्यास सरकारची तयारी असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

इकडे भारताकडून कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी प्रयत्न होत असताना, तिकडे पाकिस्तानात मात्र कुलभूषण जाधव हे रॉचे एजंट कसे आहेत हे ठासून सांगितलं जात आहे. इतकंच नाही तर पाकिस्तानातील डॉन या वृत्तपत्राने तर यापूर्वी पकडलेले कथित रॉ एजंटची नावं जाहीर केली आहेत.

त्यापैकी एक नाव म्हणजे काश्मिर सिंह होय.

कोण आहेत काश्मीर सिंह?

काश्मीर सिंह यांनाही पाकिस्तानने 1973 साली अटक केली होती. रॉचे एजंट असल्याचा आरोप त्यांच्यावरही ठेवण्यात आला होता. सुमारे 35 वर्ष ते पाकिस्तानी जेलमध्ये होते.

पाकिस्तानकडून काश्मिर सिंह यांना सातत्याने स्पाय किंवा गुप्तहेर म्हणूनच प्रस्तुत केलं. मात्र जेलमध्ये त्यांनी अवाक्षरही काढलं नाही. आपण गुप्तहेर नाही हे त्यांनी ठासून सांगितलं.

दरम्यानच्या काळात भारत-पाकिस्तान संबंध सुधारले. त्यानंतर पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी काश्मीर सिंहांच्या सुटकेला परवानगी दिली.

पाकिस्तानी जेलमधून सुटका

तब्बल 35 वर्षे पाकिस्तानी कोठडीत घालवल्यानंतर, काश्मीर सिंह यांचं 2008 मध्ये भारतात जल्लोषी स्वागत करण्यात आलं. मात्र भारतात आल्यानंतर, काश्मीर सिंह यांनी एकच खळबळ उडवून दिली.

''होय, मी स्पाय होतो''

भारतात परतल्यानंतर काश्मीर सिंह यांनी आपण स्पाय अर्थात गुप्तहेर असल्याचं जाहीरपणे सांगून खळबळ उडवून दिली होती.  पीटीआय, टाईम्स ऑफ इंडियासह आघाडीच्या वृत्तपत्रांनी त्याला प्रसिद्धी दिली होती.

"मी भारताचा गुप्तहेर होतो. माझं जे कर्तव्य, जी जबाबदारी होती ती मी योग्यप्रकारे बजावून, देशसेवा केली" असं काश्मीर सिंह त्यावेळी म्हणाले होते.

तुम्ही पाकिस्तानात कसे घुसला होता, असं त्यांना विचारलं असता, तुम्हीच काय पण पाकिस्तानी अथॉरिटीही त्याबाबत माझ्याकडून जाणून घेऊ शकली नाही, असं त्यांनी 2008 साली सांगितलं होतं.

मला त्यावेळी पगारापोटी, कामानुसार 400 रुपये मिळायचे. त्यामुळेच मी देशसेवा करण्यासाठी गेलो होतो, असंही ते म्हणाले होते.

अशाप्रकारचं काम करणाऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, असं विचारलं असता, "मी स्पाय होतो आणि मी माझं कर्तव्य बजावलं. इतरांबद्दल मला काही बोलायचं नाही. त्याबद्दल बोलण्यासाठी मी काही देशाचा राष्ट्रपती नाही" असं काश्मीर सिंह म्हणाले होते.

काश्मीर सिंह यांना पाकिस्तानमध्ये सात विविध जेलमध्ये ठेवलं होतं.

जेलमध्ये मी कसा राहिलो, माझं दैनंदिन जीवन कसं होतं, याबद्दल काहीही बोलायचं नाही असंही ते म्हणाले होते.

"मी केवळ एवढंच सांगू शकतो, माझी देवावर श्रद्धा होती. मी नमाजही पढायचो इतकंच काय तर रोजाचा उपवासही करायचो. जेलमध्ये पाकिस्तानी कैदी मला इब्राहीम म्हणत होते", असं त्यांनी सांगितलं होतं.

मी तब्बल 17 वर्षे एकांतवासात होतो, असंही काश्मीर सिंह म्हणाले होते.