मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमुक्त भारतचा जो नारा दिला होता, तो प्रत्यक्षात येताना दिसत आहे. 2014 साली यूपीएचं देशातील जवळपास 35 टक्के लोकसंख्येवर राज्य होतं, तर एनडीएचं केवळ 22 टक्के लोकसंख्येवर.. मात्र एनडीएचं सध्या जवळपास 68 टक्के जनतेवर राज्य आहे, तर यूपीएचं केवळ 8 टक्के जनतेवर राज्य आहे.

देशातील सद्यपरिस्थितीत काँग्रेस आणि यूपीएतील मित्रपक्षांचीही हीच परिस्थिती आहे. 2004 साली काँग्रेससोबत असलेल्या डाव्यांचा गड मानला जाणाऱ्या त्रिपुरात भाजपने झेंडा फडकावला आहे. डाव्यांचा पक्ष आता केवळ केरळपर्यंतच मर्यादित राहिला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचा जुना मित्रपक्ष तृणमुल काँग्रेसही सध्या वेगळा आहे. मात्र तृणमुलकडेही पश्चिम बंगाल हे एकच राज्य आहे.



तामिळनाडूतील डीएमके हा पक्षही काँग्रेससोबत होता, मात्र मोदींच्या रणनितीने जयललितांच्या निधनानंतर तामिळनाडूतील दोन्ही गट भाजपच्या जवळ आले आहेत. आरजेडी आणि समाजवादी पार्टीही काँग्रेसचे मित्रपक्ष होते, मात्र त्यांच्याकडे सध्या एकही राज्य नाही.

सतत पराभवाचे धक्के सहन करत असलेला काँग्रेस पक्ष 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी एकाकी आहे. तर मित्रपक्षांचीही हीच अवस्था आहे. दुसरीकडे मोदींच्या नेतृत्त्वात विजयरथावर सवार झालेल्या भाजपला रोखण्याचं आव्हान काँग्रेससमोर आहे.