नवी दिल्ली : ''त्रिपुरा, कर्नाटक, पश्चिम बंगाल असो किंवा केरळ, या राज्यांमध्ये गेल्या सहा महिन्यात भाजपच्या 24 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. ईशान्य भारतातील विजयासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी बलिदान दिलं आहे,'' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा विजय भाजप कार्यकर्त्यांना समर्पित केला.


त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी भाजपच्या दिल्लीतील नव्या मुख्यालयात जाहीर सभा घेतली आणि कार्यकर्त्यांना संबोधित केलं. पंतप्रधान मोदींनी या यशाचं श्रेय अमित शाह यांना दिलं.

''सूर्योदयावेळी सूर्याचा रंग केसरी, तर सूर्यास्तावेळी लाल रंग असतो. देशात आता केसरी रंग दिसेल,'' असं म्हणत पंतप्रधान मोदींनी त्रिपुरातील विजयावर आनंद व्यक्त केला. भ्रम आणि भीती पसरवणाऱ्यांना मतदारांनीच उत्तर दिलं आहे, असं ते म्हणाले.

''ईशान्येकडील लोकांना अगोदर वाटायचं की दिल्ली आपल्यापासून दूर आहे. मात्र भाजपने हे चित्र बदललं. दिल्ली ईशान्येकडील लोकांच्या दारात आणली आहे,'' असं मोदी म्हणाले. जास्तीत जास्त मंत्र्यांचं लक्ष ईशान्येकडे असतं, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, निवडणुका शांततेत पार पाडल्यामुळे निवडणूक आयोग आणि सुरक्षा यंत्रणांचं मोदींनी अभिनंदनही केलं.

अजानमुळे भाषण थांबवलं

भाजप मुख्यालयात सभा सुरु झाल्यानंतर अमित शाह यांनी अगोदर भाषण केलं. अमित शाह यांच्यानंतर पंतप्रधान मोदींचं भाषण सुरु झालं. मात्र भाषण सुरु होताच अजानचा आवाज मोदींच्या कानावर पडला. त्यामुळे अजान पूर्ण होईपर्यंत मोदींनी भाषण थांबवलं.

काँग्रेसवर निशाणा

''पुद्दुचेरीचे काँग्रेसचे मुख्यमंत्री नारायण सामी यांचं मी जाहीर अभिनंदन केलं. त्यांना म्हटलं तुम्ही खूप भाग्यवान आहात. ‘येणाऱ्या काळात काँग्रेसवर आमचे पण कधी मुख्यमंत्री असायचे’, अशी सांगायची वेळ येणार आहे, त्यावेळी ते तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचतील. ‘बघा, आमचा पण 1 सीएम आहे’,'' असं म्हणत मोदींनी काँग्रेसला टोला लगावला. शिवाय काँग्रेसची सध्या जी परिस्थिती आहे, ती यापूर्वी कधीही नव्हती, असंही ते म्हणाले.

2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी ईशान्य भारतात मोदी लाट दिसून आली. त्रिपुरात तब्बल 25 वर्ष सत्तेत असणाऱ्या डाव्यांना धक्का देत भाजपला जनतेने बहुमत दिलं. तर नागालँडमध्येही भाजपने मुसंडी मारली आहे. शिवाय मेघालयमध्ये सत्ताधारी काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे.

त्रिपुरा राज्यातल्या 60 पैकी 43 जागा मिळवत भाजपने बहुमत मिळवलं. तर डाव्यांना फक्त 16 जागांवर समाधान मानावं लागलं. गेल्या निवडणुकीत 10 जागा मिळवणाऱ्या काँग्रेसला यंदा त्रिपुरात खातंही उघडता आलं नाही.