मुंबई : त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमधील निकालावरुन हार्दिक पटेलने विरोधकांना उद्देशून ट्वीट केले, हे ट्वीट आता सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. राहुल गांधी, ओमर अब्दुल्ला यांच्यासोबत अभिनेत्री-गायिका ममता मोहनदास हिला हार्दिकने ट्वीटमध्ये टॅग केले आहे. त्यामुळे हार्दिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.


ईशान्येतील निकालावरुन विरोधकांना इशारा देणारं ट्वीट करत हार्दिक पटेल म्हणाले, “जोपर्यंत विरोधी पक्ष मजबूत होत, जनता आणि देशाचे मुद्दे उठवत नाहीत, तोपर्यंत सत्तेतील लोक आपली मनमानी आणि सत्तेचा दुरुपयोग करतच राहणार. शिवाय निवडणुका जिंकून जनतेसमोर ते बरोबर असल्याचे सिद्ध करत राहतील. एक नेतृत्त्व आणि एका ध्येयासोबत विरोधकांना पुढे जावं लागणार आहे.”



हार्दिक पटेलने या ट्वीटमध्ये राहुल गांधी, ओमर अब्दुल्ला आणि ममता मोहन यांना टॅग केले आहे. ममता बॅनर्जी यांच्याऐवजी गायक-अभिनेत्री ममता मोहनदास हिला टॅग केल्याने ट्विटरवर हार्दिक पटेलला ट्रोल केले जात आहे.

ममता मोहनदास कोण आहे?

ममता मोहनदास अभिनेत्री आणि गायक आहे. मल्याळम, कन्नड, तामिळ आणि तेलुगू या भाषांमधील सिनेमांमध्ये ममताने अभिनय केला आहे. त्याचसोबत, तेलुगू सिनेमांमध्ये गाणीही गायली आहेत. 2006 साली तेलुगूमधील सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका आणि 2010 साली मल्याळममधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री यांसाठीच्या फिल्म फेअर पुरस्काराने ममता मोहनदास हिचा गौरव झाला होता.