NDA MPs Meeting: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार (31 जुलै) रोजी एनडीएच्या (NDA) खासदारांची बैठक पार पडणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यशाचा कानमंत्र देण्याची शक्यता आहे. एनडीएमधील खासदारांच्या बैठकीचा (Meeting) कार्यक्रम हा 11 दिवसांचा असणार आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकांची (Loksabha Election) रणनिती आखण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या सर्व खासदारांच्या 31 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान विविध गटांमध्ये बैठकांचं नियोजन करण्यात आलं असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तर पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, एनडीएच्या खासदारांचे एकूण 11 गट तयार करण्यात आले आहेत. या 11 गटांपैकी एका दिवसांत दोन गटांची बैठक घेण्यात येणार आहे. सोमवार (31 जुलै) रोजी संध्याकाळी 6:30 वाजता उत्तर प्रदेशच्या खासदारांसोबत पहिली बैठक सुरू होणार आहे. तर दुसरी बैठक ही सोमवार (31 जुलै) रोजी संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून सुरु होणार आहे.
एनडीएच्या खासदारांची पहिली आणि दुसरी बैठक
एनडीएच्या कानपूर, बुंदेलखंड, ब्रज (उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थान) इथल्या खासदारांसोबत होणार आहे. ही बैठक दिल्लीत महाराष्ट्र सदनात आयोजित संध्याकाळी 6:30 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप नेते संजीव बल्यान आणि बीएल वर्मा उपस्थित राहणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी होणाऱ्या दोन्ही बैठका या वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहेत. तर प्रत्येक गटाच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: उपस्थित राहणार आहेत. तर सोमवारी (31 जुलै) रोजी संध्याकाळी 7:30 होणाऱ्या दुसऱ्या बैठकीमध्ये पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशा राज्यातील खासदार सहभागी होणार आहेत. या बैठकीमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, धर्मेंद्र प्रधान, शंतनू ठाकूर, भाजप नेते बैजयंत पांडा आणि दिलीप घोष उपस्थित राहणार आहेत. ही बैठकी संसद भवनात होणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिनेच शिल्लक राहिले आहेत. त्याआधी पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या खासदारांच्या या बैठका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यावर एनडीएच्या नेत्यांशी संवाद साधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.