Navjot Singh Sidhu Released : पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू दहा महिन्यानंतर तुरुंगाबाहेर आले आहेत. माजी क्रिकेटपटू सिद्धू यांना 1988 च्या 'रोड रेज' प्रकरणी एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. 20 मे 2022 पासून सिद्धू तुरुंगात शिक्षा भोगत होते. सिद्धू यांना चांगल्या वर्तवणुकीमुळे 48 दिवस आधीच तुरुंगातून सोडण्यात आले. सिद्धू तुरुंगाबाहेर आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागात केले.
10 महिन्यानंतर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सिद्धू यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, “पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचं षड्यंत्र रचलं जात आहे. पंजाबला कमकुवत करण्याचं काम केलं जात असून अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्यात येत आहे. देशात लोकशाही राहिली नसून, हुकूमशाही आली आहे. पण, देशात एक क्रांती आली आहे. त्याचं नाव राहुल गांधी आहे.”
सिद्धू यांनी न्यायालयात आत्मसमर्पण केले होते
1988 च्या 'रोड रेज' प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धू यांना एक वर्षाची शिक्षा सुनावली. 20 मे 2022 रोजी नवज्योत सिंह सिद्धू यांनी न्यायालयात आत्मसमर्पण केले. सिद्धू यांनी आत्मसमर्पण केले आणि तिथून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी माता कौशल्या रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांची रवानगी पटियाला मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. नवतेज सिंग चीमा, अश्विनी सेखरी, हरदयाल सिंग कंबोज आणि पिरामल सिंग आणि त्यांच्या समर्थकांसह सिद्धू त्यांच्या निवासस्थानातून न्यायालयात गेले. यापूर्वी सिद्धूने सुप्रीम कोर्टाकडे आत्मसमर्पणासाठी वेळ मागितला होता. मात्र, त्यांच्या मागणीवर सुनावणी झाली नाही. त्यानंतर सिद्धू यांनी आत्मसमर्पण केले.
प्रकरण नेमकं काय?
27 डिसेंबर 1988 च्या संध्याकाळी सिद्धू हे त्यांचे मित्र रुपिंदर सिंह संधूसोबत पटियालाच्या शेरावले गेटच्या बाजारात पोहोचले होते. हे ठिकाण त्यांच्या घरापासून 1.5 किमी अंतरावर आहे. तेव्हा सिद्धू क्रिकेटपटू होता. त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरु होऊन फक्त एक वर्ष झाले होते. त्याच मार्केटमध्ये कार पार्किंगवरून 65 वर्षीय गुरनाम सिंह यांच्याशी त्यांचा वाद झाला. प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. सिद्धू यांनी गुरनाम सिंहला पाडले. त्यानंतर गुरनाम सिंह यांना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. गुरनाम सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त समोर आले होते. या प्रकरणात सिद्धू यांची ट्रायल कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. पण हायकोर्टाने सिद्धू यांना 3 वर्षांची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला सिद्धू यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. 15 मे 2018 रोजी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धू यांना एक हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. परंतु मे 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विलोकन याचिकेवर सुनावणी करताना सिद्धू यांना एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.