भुवनेश्वर : ओदिशा विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवलेल्या बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनायक सलग पाचव्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनले आहेत. लोकसभा निवडणुकीसोबतच पार पडलेल्या ओदिशा विधानसभा निवडणुकीत बिजू जनता दलाने पुन्हा एकदा मोठा विजय मिळवला आहे. त्यानंतर सलग पाचव्यांदा नवीन पटनायक यांनी ओदिशाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. भुवनेश्वर येथे त्यांचा हा शपथविधी सोहळा आज पार पडला.


ओदिशाचे राज्यपाल गणेशी लाल यांनी नवीन पटनायक यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. यावेळी त्यांच्या नव्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांनी देखील शपथ घेतली. ओदिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला.


लोकसभा निवडणुकीत देशभरात मोदींचा करिश्मा चाललेला दिसत असताना ओदिशामध्ये मात्र पुन्हा एकदा नवीन पटनायक यांनाच जनतेने कौल दिला आहे. मोदी लाटेतही बिजू जनता दलाने 112 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे नवीन पटनायक सलग पाचव्यांदा ओदिशाच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले आहेत. ओदिशामध्ये विधानसभेच्या एकुण 147 जागा आहेत. त्यापैकी 146 जागांवर यंदा निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपने 23 जागा जिंकल्या आहेत तर काँग्रेसला 9 जागांवर विजय मिळाला आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ओदिशामध्ये बिजू जनता दलास 117, काँग्रेसला 16 आणि भाजपला 10 जागा मिळाल्या होत्या.